आयएमएच्या वतीने रविवारी लातुरात मॅरेथॉन स्पर्धा
स्पर्धेची तयारी झाल्याची डॉ. अजय जाध
व यांची माहिती
लातूर ,दि. ३० : आयएमए लातूर शाखेच्या वतीने ' एक धाव आरोग्यासाठी' हे ब्रीद वाक्य घेऊन येत्या रविवार, दि. ०२ फेब्रुवारी २०२० रोजी ' सनरीच आयमेथॉन २०२० - लाईफसेव्हर्स रन ' मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेची तयारी पूर्ण झाल्याची माहिती आयएमए चे अध्यक्ष डॉ. अजय जाधव यांनी लातुरात गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
स्पर्धेच्या पूर्वतयारीची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना डॉ. अजय जाधव म्हणाले की, आजच्या धावपळीच्या युगात शारीरिक सदृढतेकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही. परिणामतः व्यायामाच्या अभावाने अनेक व्याधींचा सामना करण्याची वेळ येऊन ठेपते. त्यामुळे ' एक धाव आरोग्यासाठी' हे ब्रीद वाक्य घेऊन लातुरात शारीरिक सदृढता व मॅरेथॉन संबंधी अधिकाधिक जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने लातुरात प्रथमच स्पर्धकांना इलेक्ट्रॉनिक टाईमिंग बिब सहित इतर अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या तयारीसाठी विविध मार्गदर्शन शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते. त्याचा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शेकडो डॉक्टर्स व शहरातील उत्साही धावपटूंनी घेतल्याचे त्यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी तब्बल ९०० हुन अधिक डॉक्टर्स तसेच उत्साही धावपटूंनी आपली नांवे नोंदवली आहेत. या स्पर्धेस रविवार, दि. ०२ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी सहा वाजता कस्तुराई मंगल कार्यालय, औसा रोड, लातूर येथून सुरु होईल. स्पर्धा ३ किमी., ५ किमी. व १० किमी. या वर्गामध्ये होणार आहे.
या स्पर्धेसाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, महापौर विक्रांत गोजमगुंडे, मनपा आयुक्त सिंग आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या असल्याचे सांगून डॉ. जाधव पुढे म्हणाले की, या मॅरेथॉन स्पर्धेबरोबरच आयएमए च्या वतीने डॉक्टरांसाठी क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, स्विमिंग, कॅरम, बुद्धिबळ, अशा विविध क्रीडा स्पर्धांचेही आयोजन केले असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. तज्ज्ञ डॉक्टर्सना दररोज आपल्या व्यवसायांमध्ये अत्याधिक ताणतणावाचा सामना करावा लागतो. त्यामुळे आजघडीला डॉक्टरांचेच आरोग्य धोक्यात आले आहे, असे म्हटल्यास ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे त्यांना कांहीसा विरंगुळा मिळावा, मानसिक ताण कमी होऊन फिटनेस संबंधी समाजात अधिक जागृती व्हावी, या उद्देशानेच या स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. महिलांनीही आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आयएमएचे सचिव डॉ. संतोष डोपे, डॉ. वैशाली चपळगांवकर, डॉ. चांद पटेल, डॉ. आरती झंवर, डॉ. ज्योती पाटील, डॉ. कल्पना किणीकर, डॉ. कांचन जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती होती.