खून करून ‘दृश्यम’ स्टाइलने लपवला मृतदेह, नागपुरात प्रेयसीच्या पतीची हत्या करणारा गजाआड
गुन्हेगारांनी अजय देवगणच्या 'दृश्यम' सिनेमावरून प्रेरणा घेत गुन्हा केला आणि तो लपवण्यासाठी तशीच युक्ती वापरली. पण धाब्यामागे पुरलेला मृतदेह पोलिसांनी शोधला आणि आरोपींना गजाआड केलं.
नागपूर: कानून के हाथ लंबे होते है! हा सिनेमा, सिरियलमध्ये हमखास वापरला जाणारा डायलॉग गुन्हेगार विसरतात आणि सिमेमातल्या एखाद्या गुन्ह्याची पुनरावृत्ती करत कायद्यापासून पळ काढतात. नागपूरमध्ये अशीच एक घटना समोर आलीय. ज्यात गुन्हेगारांनी अजय देवगणचा दृश्यम सिनेमावरून प्रेरणा घेत गुन्हा केला आणि तो लपवण्यासाठी नामी शक्कल लढवली. पण अखेर नागपूर शहर पोलिसांनी तीन गुन्हेगारांना बेड्या ठोकल्यात. या तिघांवर एका व्यक्तीची हत्या करून गुन्हा लपवण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा आरोप आहे.
गिरामकर हल्दीराम कंपनीत इलेट्रिशियन म्हणून काम करत होता. मुख्य आरोपी धाब्याचा मालक अमरसिंग उर्फ लालू जोगेंद्रसिंह ठाकूरचे (24) गिरामकरच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. ठाकूरपासून पत्नीला दूर ठेवण्यासाठी गिरामकर वर्धा जिल्ह्यात राहायला गेला. गिरामकर 28 डिसेंबर रोजी अमरसिंगच्या धाब्यावर गेला. तिथं त्यानं आरोपीला पत्नीसोबतचे प्रेमसंबंध संपवायला सांगितले. त्यावेळी दोघांमध्ये मोठा वाद झाला. वाद इतका चिघळला की ठाकूरेने गिरामकरच्या डोक्यात हातोडा घालून त्याची हत्या केल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त निलेश भार यांनी ही माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ठाकूरने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं 10 फूट खड्डा खणला. त्यात गिरामकर आणि त्याची बाईक पुरून टाकली. पण गिरामकर बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास सुरु केला. तपास ठाकूरच्या धाब्यावर येवून पोहोचला तेव्हा जमिनीत गाडला गेलेला गुन्हा पुन्हा वर आला. कायद्याच्या हातांनी गुन्हेगारांच्या हातात बेड्या ठोकल्या. एकूणच काय तर सिनेमा पाहून त्यातून प्रेरणा घेणारे गुन्हेगार कानून के हाथ लंबे होते है हा सिनेमातला डायलॉग मात्र विसरून जातात. गुन्हेगार कितीही चालाख असू द्या पोलिसांनी ठरवलं तर त्याची चालाखी फार काळ लपून राहू शकत नाही याची प्रचिती सध्या नागपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईतून दिसून येतीय. पोलिसांनी आरोपी ठाकूरसह त्याचे साथीदार स्वयंपाकी मनोज तिवारी, तुषार डोंगरे यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 201 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
सौ.लोकमत न्यूज