प्रभारी सचिवाच्या निलंबनासाठी, स्थायीच्या सभापतींचे निवेदन
लातूर /प्रतिनिधी :स्थायी समिती बैठकीसंदर्भात बेकायदेशीर वर्तणूक करणारे प्रभारी सचिव सुनील चनवडे यांना निलंबित करावे ,अशी मागणी स्थायी समितीचे सभापती ॲड . दीपक मठपती यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे .
मठपती यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे ,की २२ जानेवारी रोजी असणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीचा अजेंडा समितीच्या सदस्यांना पाठवण्याच्या सूचना प्रभारी सचिव सुनील चनवडे यांना दिल्या होत्या . त्यानुसार १८ जानेवारी रोजी अस्तित्वात असणाऱ्या स्थायी समिती सदस्यांना अजेंडा पाठवणे आवश्यक होते . समितीचे सदस्य नसणाऱ्या व्यक्तीस अजेंडा पाठवू नये अशा सूचना त्यांना केल्या होत्या . परंतु चनवडे यांनी त्यांना अधिकार नसताना सदस्य नसणारे चंद्रकांत बिराजदार यांना अजेंडा पाठवला . वास्तविक २०१९ - २० साठी गठीत झालेल्या स्थायी समितीचे सदस्य असणाऱ्या चंद्रकांत बिराजदार यांनी २८ मे २०१९ रोजी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता . २० जून २०१९ रोजी तत्कालीन महापौरांनी तो मंजूरही केलेला होता . त्यामुळे बिराजदार यांचे सदस्यत्व रद्द झाले होते . तरीही अजेंडा प्राप्त झाल्याने बिराजदार सभेदिवशी सभागृहात पोहोचले.त्यातून कायदेशीर पेच निर्माण झाला आणि धोरणात्मक निर्णयात अडचणी निर्माण आल्या . सुनील चनवडे हे त्यांच्या अधिकारांच्या बाहेर जाऊन सभापतींच्या सूचनांचे पालन करत नाहीत .मनमानी करून बेकायदेशीर कृती करणारे सुनील चनवडे यांना निलंबित करावे अशी मागणी सभापती ॲड . दीपक मठपती यांनी या निवेदनात केली आहे .