कर्नाळा बँके घोटाळाप्रकरणी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील यांच्यावर गुन्हा दाखल
पनवेल: कर्नाळा बँके घोटाळाप्रकरणी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह बैंकेच्या संचालक मंडळांवरील १४ सदस्यांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे जवळपास ५१५ कोटींचे कर्ज काढल्याप्रकरणी सहकार खात्याच्या तक्रारीवरून सोमवारी (१७ फेब्रुवारी) रात्री पनवेल शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून कर्नाळा बँकेच्या हजारो ठेवीदारांना व खातेदारांना पैसे मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. वारंवार आश्वासने देऊन ठेवीदारांना पैसे परत मिळत नाही. याशिवाय बोगस कागदपत्रांच्या आधारे जवळपास ५१५ कोटींचे कर्ज काढल्याचा ठपका सहकार खात्याने कर्नाळा बँकेवर ठेवला आहे. याविरोधात आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांच्या नेतृत्वाखालील कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समिती आरबीआय आणि सहकार खात्याकडे पाठपुरावा करत आहे. तसेच याविरोधात नुकताच पनवेलमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला होता. याची दखल घेत सहकार खात्याच्या तक्रारीवरून कर्नाळा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह १४ संचालकांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.