लातुरात रन फॉर मेरीटचे आयोजन,मात्र उद्देश स्पष्ट करण्यात समीतीला अपयश
लातूर /प्रतिनिधी :सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या चळवळीच्या वतीने रविवार दि.९ फेब्रुवारी रोजी लातूर येथे रन फॉर मेरीटाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ. घनश्याम दरक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. मात्र या आयोजनाचा उद्देश स्पष्ट करण्यात समीतीला अपयश आल्याचे दिसून आले.
या उपक्रमासंदर्भात माहिती देताना डॉ. दरक म्हणाले की ,मागच्या काळात राज्यात शिक्षण व नोकऱ्यात आरक्षणाचे प्रमाण वाढले आहे .परिणामी गुणवत्तेवर अन्याय झाला आहे .गुणवत्तेला न्याय मिळावा या साठी सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या चळवळी अंतर्गत अनेक मोर्चे कायद्याच्या चौकटीत राहून काढण्यात आले .भारतीय घटनेचे उल्लंघन करून लागू केलेल्या आरक्षणाविरोधात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या गेल्या आहेत .त्यांची सुनावणी नजीकच्या काळात होणे अपेक्षित आहे.
समाजातील गुणवत्तेवर होणाऱ्या अन्यायाची जनजागृती व्हावी, गुणवतेला न्याय मिळावा म्हणून रन फॉर मेरिट हा कार्यक्रम एकच दिवशी एकाच वेळी जवळ जवळ ३० शहरात आयोजित करण्यात आला आहे.
समाजातीलसर्व नागरिकांमध्ये असणाऱ्या गुणवत्तेला न्याय मिळावा , सर्वांनाच शिक्षण आणि नोकरीमध्ये गुणवत्तेनुसार अधिकार मिळावेत , गुणवत्ताधारक विद्यार्थी आणि नागरिकांना सन्मान व प्रोत्साहन मिळावे , कुठल्याही वर्गाच्या गुणवत्ताधारक विद्यार्थी आणि नागरिकांवर अन्याय होऊ नये ही या चळवळी मागची भावना जरी असली तरी आरक्षण हा विषय वेगळा असल्यामुळे या आयोजनाचा ठोस उद्देश मात्र समीतील सांगता आला नाही.
डॉ. दरक म्हणाले की , ही रन कोणाच्या विरोधात अथवा कोणाच्या बाजूने नाही . हे आंदोलनही नाही तर फक्त समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न आहे . रविवारी सकाळी ७ वाजता राजस्थान विद्यालयाच्या मैदानावरून या रन ( वॉक )ला प्रारंभ होणार आहे . देशिकेंद्र शाळा -शिवाजी चौक -अशोक हॉटेल- मिनी मार्केट -गांधीचौक या मार्गे परत राजस्थान विद्यालयाच्या मैदानावर या रनचा समारोप होणार आहे . देशाच्या उज्वल भवितव्यासाठी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले .
या पत्रकार परिषदेस डॉ.शुभांगी शास्त्री ,डॉ. नीलेश खटोड , डॉ.उगले , नितीन मालू , राजन अयाचित, ॲड जाजू आदींची उपस्थिती होती .