शिवजयंतीच्या निमित्ताने स्थायी समितीची लातुरकरांना भेट
५०० चौरस फुटापर्यंत मालमत्ता करमुक्त
लातूर :भाजपाच्या ताब्यात असणाऱ्या लातूर मनपा स्थायी समितीची विशेष बैठक आज मंगळवारी (दि. १८ )पार पडली . यात मालमत्ता कर व मनपा कराच्या संदर्भात ठोस निर्णय घेण्यात आले . २०१० च्या भाडेवाढीमध्ये करामध्ये २० टक्के सुट देण्याचा निर्णय घेण्यात आला .तसेच ५०० चौरस फुट पर्यंतच्या मालमत्तेवरील सर्व कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला .याचबरोबर माजी सैनिक व शहीदांच्या विधवांना मालमत्ता व सर्व कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला .
स्थायी समिती सभापती ॲड.दीपक मठपती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मनपाच्या गाळेधारक भाडेकरूंच्या भाड्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.ज्यात राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे बाजार मुल्याच्या आधारे भाडे निर्देशित करण्याचा निर्णय घेण्यात आला व सदरील गाळे धारकांकडून अनामत रक्कम घेण्याचा निर्णय करण्यात आला.
याविषयावर स्थायी समिती बैठकीत दोन्ही पक्षांकडून सांगोपांग चर्चा झाली .ज्यात स्थायी समिती सदस्य सुनिल मलवाड ,इम्रान शेख ,सौ स्वाती घोरपडे ,कैलास कांबळे ,विजय साबदे आदींनी विषय मांडले . सुनिल मलवाड यांनी मंजुरीसाठीचा प्रस्ताव मांडला .सौ श्वेता लोंढे यांनी अनुमोदन दिले .गेली अनेक वर्ष मालमत्ता करासंदर्भात असलेल्या वादविवादावर आज पडदा पडला. लातुरकरांना शिवजयंतीनिमित्त ही भेट देण्यात आली, असे प्रतिपादन सभापती ॲड. दीपक मठपती व सभागृह नेते ॲड.शैलेश गोजमगुंडे ,जेष्ठ नगरसेवक शैलेश स्वामी यांनी केले .
Tags:
LATUR