अखिल भारतीय स्त्री रोग परिषदेत ,लातूरच्या डॉ. बरमदे दांपत्याचा सन्मान
लातूर: लखनौ येथे नुकत्याच पार पडलेल्या ६३ व्या अखिल भारतीय स्त्री रोग परिषदेत महिलांच्या आरोग्याबाबत अतुलनीय कार्य करणारे आंतरराष्ट्रीय पातळीचे स्त्री रोग व वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. कल्याण बरमदे व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. सौ. मनिषा बरमदे यांचा सन्मान करण्यात आला.
लखनौ येथे नुकतीच अखिल भारतीय स्त्री रोग तज्ज्ञांची परिषद पार पडली. या परिषदेत देशभरातून तब्बल १५ हजारांहून अधिक स्त्री रोग तज्ज्ञ सहभागी झाले होते. लातूरहून या परिषदेसाठी विख्यात वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ. कल्याण बरमदे व त्यांच्या पत्नी स्त्री व प्रसूती रोग तज्ज्ञ डॉ. सौ. मनिषा बरमदे हे सहभागी झाले होते. या परिषदेत डॉ. कल्याण बरमदे यांना आयसीओजी फेलोशिपने सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय शोधनिबंध सादर करणाऱ्या स्त्री रोग तज्ज्ञांना या फेलोशिपने सन्मानित केले जाते. वंध्यत्व निवारण क्षेत्रात केवळ राज्य - देश पातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्याजोगे अतुलनिय कार्य करणारे डॉ. कल्याण बरमदे यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक शोधनिबंध गाजले असून या क्षेत्रातील तज्ञांसाठी ते मार्गदर्शक ठरत आहेत. त्यांच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल डॉ. कल्याण बरमदे यांना ह्या फेलोशिपने सन्मानित केले गेले. या परिषदेत डॉ. कल्याण बरमदे यांनी गर्भपिशवीची अंतर्गत तपासणी व सुरक्षित गर्भपिशवी तपासणी या विषयांवर अत्यंत अभ्यासपूर्ण असे व्याख्यान दिले. याच परिषदेत डॉ.सौ. मनिषा बरमदे यांनी गर्भावस्थेतील गुंतागुंतीपणा आणि गर्भवती मातेचा मधुमेह ह्या विषयांवर शोधनिबंध सादर केला. स्त्री रोग तज्ज्ञ व वंध्यत्व निवारण क्षेत्रातील या भरीव कार्याबद्दल डॉ. बरमदे दांपत्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मंचावर अखिल भारतीय स्त्री रोग परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार कार, डॉ. मंदाकिनी मेघ, डॉ. लक्ष्मी श्रीखंडे, डॉ. पराग बिनीवाले, डॉ. अल्पेश गांधी, डॉ. जयदीप टांक आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या सन्मानाबद्दल लातूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी डॉ. कल्याण बरमदे व डॉ. मनिषा बरमदे यांचे अभिनंदन केले आहे.