आज रात्री 12 वाजल्यापासून संपूर्ण देशात पुढील 21 दिवस लॉकडाऊन...
आज रात्री 12 वाजल्यापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात येईल. तसंच पुढील 21 दिवस लॉकडाऊन लागू राहिलं, अशी मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान म्हणून नव्हे तर तुमच्या परिवाराचा सदस्य म्हणून विनंती करतोय, पुढील 21 दिवस काहीही करु नका. फक्त आणि फक्त घरात बसा, असं मोदी म्हणाले.
देशाला वाचवण्यासाठी, प्रत्येक नागरिकाला वाचवण्यासाठी हा निर्णय लागू असेल. आज रात्री 12 वाजल्यापासून घराबाहेर पडण्यास मज्जाव असेल. हा एकप्रकारचा कर्फ्यूच आहे, असं मोदी म्हणाले.
आपल्या घराबाहेर लक्ष्मण रेखा आखून घ्या. रेषा ओलांडाल तर कोरोनासारखा महाभयंकर रोग घरी घेऊन याल. त्यामुळे घरातून बाहेर पडू नका, अशी विनंती त्यांनी देशवासियांनी केली आहे. देशात आज तुम्ही जिथे असाल तिथेच राहा, पुढील 21 दिवस तिथून हलू नका, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदी हे आज दुसऱ्यांदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना संबोधित करत आहेत. जनता कर्फ्यूला सगळ्या देशवासियांनी सफल केलं. त्यांच्या उस्फूर्त सहभागाने जनता कर्फ्यू यशस्वी झाला. तसंच देशावर संकट आल्यावर सगळे एकत्र येतात, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली. सोशल डिस्टसिंग ठेवणं हाच कोरोनाला रोखण्याचा अंतिम मार्ग आहे. या रोगाला हरवण्याचा विलगीकरण हाच एकमेव उपाय आहे. सामान्यांपासून पंतप्रधालादेखील हाच उपाय असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं