Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर जिल्ह्यात 31 मार्च 2020 पर्यंत कलम 144 चे आदेश


लातूर जिल्ह्यात 31 मार्च 2020 पर्यंत कलम 144 चे आदेश


लातूर,दि.23:- शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे.


लातूर जिल्हयातील लोकांनी सार्वजनिक किंवा खाजगी जागेत एकत्र आल्यास, कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन केल्यास या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव परसण्याची शक्यता लक्षात घेता, सर्वसामान्य जनतेस व त्यांच्या आरोग्यास धोकादायक होत असल्याने कोरोना विषाणुमुळे होणारा साथीचा /संसर्गाचा प्रभाव रोखण्यासाठी तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे.


फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये लातूर जिल्हयातील नागरी/शहरी भागाकरिता दि. 23 मार्च ते 31 मार्च 2020 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत. यामध्ये खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे सर्व प्रकारचे कार्यक्रम , समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सण,उत्सव,उरुस, जत्रा, मनोरंजनाचे कार्यक्रम,क्रिडा व इतर सर्व स्पर्धा इत्यादी यांना मनाई राहील.


पाच किंवा पाचपेक्षा अधिक नागरिकांना अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी विहित कारणाशिवाय येण्यास मनाई  राहील.


हे आदेश पुढील बाबतीत लागू राहणार नाहीत.- शासकीय/ निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाचे उपक्रम/आस्थापना, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, रुग्णालय, पॅथोलॉजी लेबॅरेटरी, दवाखाना, वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज, रेल्वे स्टेशन, एसटी स्टॅन्ड,महानगर परिवहन थांबे व स्थानके, विमानतळ व रिक्षा थांबे, बँक, पेट्रोलपंप.


पूर्वनियोजीत विवाह समारंभ (कमाल 25 व्यक्तीपुरता मर्यादीत), अंत्यविधी (कमाल 25 व्यक्तीपुरता मर्यादीत) अत्यावश्यक किराणा सामान, खाद्यपदार्थ बनविणे, वितरण व विक्रीची ठिकाणे, दुध/ दुग्ध्उत्पादने, फळे व भाजीपाला, औषधालये, उपहारगृहांनी योग्य ती सर्व खबरदारी घेवून खाद्यपदार्थ बनविणे, पार्सल स्वरुपात काऊंटर तसेच इतर मार्गाने विक्री/ वितरीत करण्यास परवानगी राहील. सर्व हॉटेल/ लॉज येथे वास्तव्यास असणाऱ्या ग्राहकांना आरोग्य विषयक आवश्यक ती खबरदारी घेवून रेस्टाँरंट मध्ये खाद्यपदार्थ बनवून देण्यासा परवानगी राहील.


ज्या आस्थापना (उद.माहिती व तंत्रज्ञान उद्योग ) ज्यांच्याकडे देश व परदेशातील अतिमहत्वाच्या (Critical-National & Internatinal Infrastructure ) उपक्रमाची जबाबदारी आहे व सदर आस्थापना बंद राहिल्याने अशा उपक्रमांच्या प्रक्रियेला बाधा येवू शकते असे सर्व संबंधीत उपक्रम कार्यान्वित राहतील. तथापी यादृष्टीने सदर आस्थापना कार्यरत ठेवण्याच्या आवश्यकतेबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालय लातूर व पोलीस अधिक्षक कार्यालय लातूर येथे विशेषरित्या कळविणे बंधन कारक राहील.


प्रसारामाध्यमांचे (सर्व प्रकारची दैनिके, नियतकालिके, टिव्ही न्युज चॅनेल इत्यादी), कार्यालय, घरपोच देणाऱ्या सेवा उदा. ॲमेझॉन, फ्लीपकार्ट, बिग बास्केट, झेमॅटो, स्विगी इत्यादी सुरु राहतील असे जिल्हादंडाधिकारी जी. श्रीकांत यांनी कळविले आहे.


Previous Post Next Post