800 पेक्षा जास्त व्यक्तींची (रुग्णालयातील दैनंदिन नियमित रुग्ण तपासणी सोडून) कोरोना-ओपीडी मध्ये तपासणी
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर येथे दिनांक २२ मार्च २०२० रोजी पर्यंत एकूण 800 पेक्षा जास्त व्यक्तींची (रुग्णालयातील दैनंदिन नियमित रुग्ण तपासणी सोडून) कोरोना-ओपीडी मध्ये तपासणी करण्यात आली आहे, पैकी मागील दोन दिवसात एकूण ६५० पेक्षा अधिक व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये पुणे - मुंबई येथून गावाकडे परत आलेल्या व्यक्तींची संख्या अधिक आहे. यामध्ये बऱ्याच जणांना कुठलेही प्राथमिक लक्षण आढळून आले नाही किंवा त्यांना कुठलाही त्रास होत नव्हता परंतु फक्त पुणे-मुंबई येथून गावाकडे परत आले असल्याने तपासणी करून घेण्यासाठी आले होते.
आज पर्यंत एकूण 32 संशयित व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी एन. आय. व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले आहेत, पैकी 28 रिपोर्ट प्राप्त असून सर्व रिपोर्ट हे निगेटिव्ह आहेत तर एकूण ०४ जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
वरील परिस्थिती लक्षात घेता शासन आदेशान्वये खबरदारीचा उपाय म्हणून या संस्थेतील सर्व विना-आपात्कालीन (Elective) शस्त्रक्रिया बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यापुढे फक्त आपात्कालीन(Emergency) शस्त्रक्रिया व उपचार चालू राहतील.
या रुग्णालयात संशयित व्यक्तींची कोरोना संबंधित तपासणी तसेच थ्रोट स्वाब घेणे व विलगीकरण सेवा पुरविण्याची महत्वाची जबाबदारी आहे. प्राथमिक स्वरूपात कुठलेही लक्षण किंवा त्रास आढळून न येणाऱ्या व्यक्ती, केवळ पुणे-मुंबई येथील प्रवास करून आले असतील तर त्यांनी जवळच्या आरोग्य केंद्रात तपासून घ्यावे व तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ज्या व्यक्तींचे स्वाब घेणे किंवा विलगीकरन करण्याची गरज वाटते अशाच व्यक्तींना या संस्थेमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात यावे. जेणेकरून या रुग्णालयात तज्ञ सेवा देणे शक्य होईल, तसेच तज्ञ सेवा पुरविणाऱ्या वैद्यकीय पथकावर अतिरिक्त ताण न येता, तज्ञ रुग्णसेवा दीर्घकाल उपलब्ध करून देणे शक्य होईल.
डॉ. गिरीश ठाकूर,
अधिष्ठाता,
विलासराव देशमुख शासकीय
वैद्यकीय विज्ञान संस्था, लातूर.