चैत्र चाहूल-लेख
लेखन:साधना ठाकूर. संपादन: देवेंद्र भुजबळ
बागेत फिरताना आता चैत्राची चाहूल लागतेच.बहावाची पिवळी झुंबरं मन आणि डोळे दोन्ही सुखावतात. मोगराही त्याच्याकडे आपल्याला लवकरच आकर्षित करेल. जास्वंदी इतकी सुंदर फुललीय ! मी माझ्या सारा आणि अगस्त्य या दोन्ही नातवंडांना त्यांची निसर्गाशी दोस्ती व्हावी आणि त्यांना सहज 'ड' जीवनसत्व मिळावं म्हणून सकाळच्या कोवळ्या सूर्य प्रकाशात फिरवून आणत असते.
तर झालं असं की , सुंदर बहरलेली जास्वंदी बघून आपण या मुलांसाठी घरीच तेल करू या असा विचार माझ्या मनात आला आणि मी फुलं तोडायला लागले. ही दोन्ही चिमुरडी पण त्यांच्या हाताला येतील,तशी पण बरोब्बर योग्य तो विचार करून फुलं तोडत होती. मधेच माझा नातू इकडे तिकडे धावत होता.मी मुद्दामच ज्या झाडावर फक्त दोनच फुलं होती ,ती तोडायला गेले. मात्र,तेवढयात आमची ठकी ओरडलीच,'आज्जी, अगं नको तोडूस त्यांना,त्यांच्या आईला किती वाईट वाटेल नं ? मला अपेक्षित प्रतिक्रियामिळाली.इतक्यात दुसरं पिल्लू धावत आलं,"आज्जी ,आज्जी मी बघ तुझ्यासाठी इनसुलीनची पानं आणलीयत". आई गं ,कित्ती गोड !.दोन्ही छकुल्याना पटकन जवळ घेऊन मी त्यांची गोडशी पप्पी घेतली,आंणि मनात म्हटलं,"चला तर, आपला हेतू सफल होतोय.!" बागेत फेर फटका मारता मारता जमेल तशी माहिती मी त्यांना अधून मधून देत रहाते.सगळी फुलं आपणच हावरटासारखी घ्यायची नसतात. एकीकडे त्यांना आपल्या मातृभाषेच्या श्रीमंतीची ओळख करून द्यायचा आपला छोटासा प्रयत्न पण करत असतेच. मधेच एखाद वेळेस फुलं ओरबाडायची नसतात,असंही सांगत रहाते.थोडा इतरांचा तसंच झाडाच्या शोभेचाही विचार करायचा हं ,आपण बाळांनो असं त्यांना हळुवारपणे सांगत असते.
आपल्याला फक्त निसर्गाच्या जवळ जायला हवं. मग 'घेता किती दो करांनी ' अशी आपली अवस्था होऊन जाते. निसर्ग एकदम वेडं करून टाकतो आपलयाला. या विश्वातल्या प्रत्येकाचा खरा-खरा सर्वात जवळचा मार्गदर्शक तोच होतो.
कधी कधी अनेक विचार मनात रुंजी घालायला लागतात.ही सगळी झाडं, फुलं आपापसांत गप्पा मारत असतील का ? " गुलाबाला म्हणत असतील,तुझा काय बाबा,भलताच थाट !मोगरा, चमेली,जाई- जुई, सोनचाफा यांना सदाफुली,तगरी तर गमतीत चिडवत असतील,तुमचं आपलं बरं आहे,सुंदर सुंदर तरूणींच्या सहवासात तुम्हाला राहायला मिळतं !आम्हाला तर बाई,तुमचा किनई फारच हेवा वाटतो.कमळाला तर काय बाबा एकदम राष्ट्रीय मान.मग बिच्चारा बोगन मात्र अगदी हिरमुसला होऊन म्हणत असेल, माझी तर जागा एकदमच पक्की असते बघा हे सर्व आठवून मलाच एकदा बोगनची दया आली.आमच्या सौंदर्य स्पर्धेत मी चक्क कडक मॅचिंग बघून माझ्या केश रचनेवर बोगन सारखा छानसा सेट केला.तेव्हा तर तो सगळयांच्या कौतुकाचा विषय झाला. सहा तास होऊन गेल्यावरही हा पठठया काही कोमेजला नव्हता !खरंच,तोही त्यादिवशी मनोमन सुखावला असेल. झेंडूला म्हणत असतील,तुझं बरंय रे,सगळयांना सकारात्मकता देतोस आणि लोभस,गोंडस दिसतोस. सण समारंभात कधी प्रवेश द्वारांवर तर कधी रथी महारथींच्या गळ्यात विराजमान होतोस. ऑर्किड,तू तर लेका,सरळ बाप्पाच्या,आई जगदंबेच्या मखरावरच आपलं बस्तान बसवतोस. मात्र ,काही गरीब बिच्चारी फुलं आपल्या भविष्याची चिंता करत असतील,"ही माणसं आमहाला नेमकी कशासाठी खुडतायत, देवपूजेसाठी,औषधासाठी, रंग तयार करण्यासाठी की अन्य कशासाठी ? खरंच काही कळत नाहीसं झालंय,या मानवजातीचं ! एकंदरीत सारासार विचाराअंती असं जाणवून गेलं.....*बहरला पारिजात दारी
फुले का? पडती शेजारी आपण पारीजातकासारखं असावं, सगळं देऊन मोकळं व्हावं बकुळीसारखं फक्त दरवळत रहावं* . मी तर म्हणीन,की आपापल्या सोसायटयांमधून मोकळी जागा उपलब्ध असेल तर आपण फुला- फळांप्रमाणेच नक्षत्र बागही करावी. आरोग्याला हितकर अशी. थोर भारतीय वनस्पती शास्त्रज्ञ सर जगदीशचंद्र बोस यांच्या तत्वांची जोपासना करावी. झाडांना संगीत ऐकवावं. मी मारते झाडांशी गप्पा. मग ती पण खूष होऊन डोलायला लागतात त्यांना गोंजारते.मग ती पटापट बहरायला लागतात.कित्ती छोटीसी अपेक्षा असते नं,आपल्याकडून त्यांची !पण कुठे तो वड,पिंपळ,अशोक!! रामायणात सितेने अशोक वनात बसून आम्हा बायका-मुलींना सुंदरसा संकेतच दिला,"अशोकाला टेकून बसा.म्हणजे ते ४ दिवस तुम्हाला सहज सोप्पे होतील.अवेळी शोक करायची वेळ तुमच्यावर येणार नाही सख्यानो . 'जांभूळाख्यान' तर आपल्या सर्वांना माहीतच असेल असा हा निसर्गराजा , न थकता आपल्यावर अखंड प्रेमाची बरसात करत असतो.आजोबा महाराजांची लागवड करतात आणि नातूशेठ मस्त यथेच्च रसास्वाद घेत असतात.तर आपल्या लेकरांसाठी बाबा कल्पवृक्ष लावून जातो.जाता जाता फक्त इतकंच गुण गुणावसं वाटतं,
हिरवा निसर्ग हा भवतीने
जीवन सफर करा मस्तीने
मन सरगम छेडावे रे
जीवनाचे गीत गा रे,गीत गा रे, धुंद व्हा रे,गीत गा रे.........