लातूरकरांनी समारंभाचे आयोजन व बाहेरगावी जाणे टाळावे.- १०४ या टोल फ्री क्रमांक अथवा विलासरावजी देशमुख शासकीय वैद्यकीय संस्था यांना २५५८३३ या क्रमांकावर संपर्क करावा
जगभराने धसका घेतलेल्या करोना विषाणू संसर्ग रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाने ३१ मार्च २०२० पर्यंत राज्यातील सर्व अंगणवाडी, शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, चित्रपटगृहे, मॉल, स्विमिंग पूल व गर्दीचे ठिकाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनानेही आदेश निर्गमित केलेले आहेत. यास प्रतिसाद देत शाळा-महाविद्यालय यांनीही याबाबत पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दिनांक १६ मार्च पासून शहरातील सर्व शाळा महाविद्यालय व गर्दीचे ठिकाणी बंद राहणार आहेत.
आज रोजी लातूर मध्ये एकही करोना बाधित रुग्ण नसला तरी नागरिकांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासनाने सर्वतोपरी उपाययोजना सज्ज ठेवलेल्या आहेत.
लोकनेते विलासरावजी देशमुख शासकीय वैद्यकीय संस्था येथे ४६ बेड सह खाजगी रुग्णालय येथील ३० बेड आरक्षित ठेवण्यात आले आहेत. खबरदारीची उपाययोजना म्हणून संशयित कोरोना विषाणू संसर्ग व्यक्तींना विलग करून स्वतंत्र कक्ष आणि याव्यतिरिक्त कोरोना विषाणू संसर्ग संक्रमित झालेल्या व्यक्ती आढळून आल्यास आयसोलेशन कक्ष स्थापन करण्याकरिता नऊ शासकीय इमारतीचे अधिग्रहण करून त्या इमारती आरोग्य विभागाच्या अधिनस्त देण्याचे आदेश मा. जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
अफवांवर विश्वास ठेवू नये.
लातूरमध्ये करोना विषाणूंची लागण झालेला एकही रुग्ण नाही तसेच जिल्हा व मनपा प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सज्ज ठेवलेले आहेत. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचे संदेश पसरवले जाण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. तरी असे संदेश पसरविण्यात येत असल्यास तातडीने जिल्हा प्रशासनास सूचित करावे व अफवांवर विश्वास न ठेवता जिल्हा प्रशासनास संपर्क करून खात्री करावी. याकरिता १०४ या टोल फ्री क्रमांक अथवा विलासरावजी देशमुख शासकीय वैद्यकीय संस्था यांना २५५८३३ या क्रमांकावर संपर्क करून अधिक माहिती मिळवता येईल.
Tags:
LATUR