Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

बालकांचे किमान प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून होणे गरजेचे आहे : प्रा. दर्शना देशमुख

 


बालकांचे किमान प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून होणे गरजेचे आहे : प्रा. दर्शना देशमुख


लातूर, दि. ०४ : मराठी भाषा ही सौंदर्यशील , भावनिक, हृदयाला स्पर्श करणारी असल्याने या मातृभाषेतून बालकांचे किमान प्राथमिक शिक्षण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कवयित्री, प्रा. दर्शना देशमुख यांनी केले.

 लातूर येथील मोरे नगर परिसरातील शिवछत्रपती विद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी संस्था अध्यक्ष गोविंद गोपे , सचिव सौ. मनिषा  गोपे , मुख्याध्यापक सुभाष मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रा. दर्शना देशमुख व सौ. रेखा देवणे  यांच्या हस्ते कविवर्य कुसुमाग्रज आणि भारतीय शास्त्रज्ञ डॉ.सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. मराठी राजभाषा गौरव दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी आपले विचार व्यक्त करतांना  प्रा. दर्शना देशमुख म्हणाल्या की, मराठी भाषेने महाराष्ट्रातील संत, किर्तनकार , प्रबोधनकार, साहित्यिक, समाजसुधारकांना उत्तुंग व्यक्तिमत्व प्रदान केले आहे. मराठी भाषेत जी आपुलकीची भावना जाणवते, ती अन्य कोणत्याही भाषेत नाही, असे म्हटल्यास ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. 

विज्ञान हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक असून विज्ञानाने निर्मिलेल्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तरच आपली भावनिक, बौद्धिक आणि अध्यात्मिक प्रगती होण्यास मदत होईल. विज्ञानाची कास धरणे सर्वांगीण प्रगतीसाठी महत्वपूर्ण असल्याचेही प्रा. देशमुख यांनी सांगितले. 

यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अभंग, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा तसेच ' अति तिथे माती' आणि ' पाण्याची गोष्ट ' या नाटिका सादर करून उपस्थितांची व मान्यवरांची माने जिंकली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. स्नेहल सिंगापूरे  यांनी केले. सूत्रसंचालन सौ. अर्चना मोरे यांनी तर आभार प्रदर्शन कु. योगिता गुंजीटे  यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक धर्मवीर औरादे यांसह  विद्यालयातील सर्व शिक्षक - शिक्षिकांनी परिश्रम घेतले. 

Previous Post Next Post