विक्रमी वर्षात नाटक शहराकडून ग्रामिण भागात पोचवणार - शरद पोंक्षे
मे महिन्यात लातूरात रंगणार १०० वे नाट्यसंमेलन
लातूर - अखील भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने यंदा लातूर जिल्ह्यात १०० व्या नाट्यसंमेलनाचे आयोजन होत आहे. याप्रसंगी संमेलनाच्या आयोजनाविषयीचा आढावा घेण्यासाठी नाट्यपरिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, कार्यवाह सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे हे लातूरमध्ये आले होते. या वेळी आयोजीत पत्रकार परिषदेत बोलताना शरद पोंक्षे म्हणाले की, यंदा संमेलनाचं १०० वं वर्ष आहे. अशी सलगपणे शंभर संमेलनं भरवणारी अ. भा. मराठी नाट्यपरिषद ही जगातली एकमेव संस्था असून हा जागतिक विक्रम आहे. आणि हे विक्रमी संमेलन लातूर जिल्ह्यात आयोजीत होत आहे. यात होणार्या नाट्यजागराच्या माध्यमातून शहरापुरतं मर्यादीत राहिलेलं मराठी नाटक ग्रामिण भागापर्यंत पोचवण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
लातूरमध्ये पहिल्यांदाच नाट्यसंमेलन होत असून याचे आयोजन नाट्यपरिषद लातूर महानगर शाखा करित आहे.
याप्रसंगी उपस्थीत असलेले परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी माहिती दिली की, लातूर जिल्ह्यात दि. ४ मे ते १० मे या कालावधीत नाट्यसंमेलन होणार असून, ते केवळ शहरापुरतेच मर्यादीत न रहाता, ते संबंध जिल्ह्यात होणार आहे. यात लातूर शहरासोबतच उदगीर, अहमदपूर आणि निलंगा या तालुक्याच्या ठिकाणी दि. ४ मे ते ७ मे असा चार दिवसाचा नाट्यजागर होणार असून, यात महाराष्ट्रातील नामवंत कलावंतांचा सहभाग असलेले चार व्यावसायिक नाटके सादर होतील. तर दि. ८ मे रोजी शहरातील मुख्य रस्त्यावरुन नाट्यदिंडी निघून शुभारंभ व उद्घाटन होईल. दि. ९ मे रोजी लातूर जिल्ह्यातील नाट्य कलावंतांच्या विविध नाट्यकलाप्रकारांचे सादरिकरण होईल. ज्यात निवडक एकपात्री प्रयोग, एकांकिका, संगीत नाटक, नृत्य नाट्य, प्रायोगिक नाटक, बालनाट्य अशा नाटकाच्या विविध कलाप्रकारांचा समावेश असेल.
तर १० मे रोजी मध्यवर्तीकडून येणारे विविध नाटके, दिर्घांक, एकांकिका, नाट्यरजनी, विविध विषयांवरील परिसंवाद आदी भरगच्च कार्यक्रम होतील.
पुढे बोलताना श्री कांबळी म्हणाले की, या नाट्यसंमेलनास महाराष्ट्रातील किमान २०० नाट्यकलावंत तथा रंगकर्मी हजेरी लावणार असून नाट्यप्रयोगासह अनेक उपक्रमात सहभागी होणार आहेत. या संमेलनाच्या माध्यमातून लातूर व परिसरात नाट्यचळवळ रुजण्यास मदत होईल. याचा सर्व नाट्यकलावंत व रसिकांनी आनंद घ्यावा असे अवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी नाट्यसंमेलनाचे आयोजक लातूर महानगर शाखेचे अध्यक्ष शैलेश गोजमगुंडे यांनी प्रास्ताविक केले. व येत्या काळात स्थानिक कलावंतांसाठीचे कार्यक्रम लवकरच जाहीर होतील असे सांगितले.
या पत्रकार परिषदेस नियामक मंडळ सदस्य व नाट्यनिर्माते दिगंबर प्रभु, अशोक नारकर, बालजी शेळके, डॉ. दिपक वेदपाठक, शुभदा रेड्डी, मृणाल कुलकर्णी, शिरिष पोफळे, सुधन्वा पत्की, सुनिता कुलकर्णी, उमा व्यास, नामदेव मुसणे आदी उपस्थीत होते.