कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश बंदी
काळजी घेण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन
मुंबई, दि. 16 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय तसेच अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी आजपासून मंत्रालयात अभ्यागतांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय कामकाजासाठी येऊ इच्छिणाऱ्या लातूर येथील नागरिकांनी मुंबईत येण्याचे टाळावे असे आवाहन वैद्यकीय शिक्षण तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.
देशातील कोरोनाच्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत विशेषत: शहरी भागात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे हे लक्षात घेऊन लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी राज्यातील सर्वच मोठ्या शहरांकडे प्रवास टाळावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, वैयक्तिक स्वच्छता बाळगावी तसेच महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये असेही अमित देशमुख यांनी म्हटले आहे.
लातूर जिल्ह्यातील ज्यानागरिकांनी अलीकडे आंतरराष्ट्रीय प्रवास केला असेल त्यांनी अधिक सतर्क राहून स्वतः बरोबरच इतरांची काळजी घ्यावी असे आवाहनही अमित देशमुख यांनी केले आहे