मनपाच्या नागरी आरोग्य केंद्रात
डॉक्टरच नसल्याने रुग्णसेवा ठप्प
लातूर,दि.४ः लातूर शहर महानगर पालिकेच्या सिध्दार्थ सोसायटी व ताजोद्दीन बाबा नगरातील नागरी आरोग्य केंंद्रात गेली महिनाभरापासून डॉक्टरच नसल्याने रुग्णांच्या आरोग्य सेवेची ऐशी की तैशी झाली असून, मनपाने येथे तातडीने डॉक्टर उपलब्ध करुन द्यावेत ,अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.
लातूर शहर महानगर पालिकेच्या वतीने शहरातल्या विविध वस्त्यांमध्ये रुग्णांना सर्दी,खोकला, ताप व इतर किरकोळ आजारांवर जवळपास प्राथमिक केंद्रातून सेवा देण्यासाठी नागरी आरोग्य केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.आवश्यक साहित्य व औषधांचा साठाही येथे पुरेसा व चांगल्या प्रकारे उपलब्ध असून, या नागरी आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर,नर्स व कंपाउंडर,व इतर कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहेत.त्यांच्याकडून रुग्णांना अगदी जवळच सेवा मिळत होती,त्यामुळे नागरिकात समाधान होते पण या चांगल्या रुग्णसेवेला गेली महिन्यापासून जणू कोणाची नजर लागली आहे कोण जाणे,पण सिध्दार्थ सोसायटी व ताजोद्दीन बाबा नगरातील दोन्ही नागरी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी येणेच बंद केल्याचे आम आदमी पार्टीच्या पदाधिकार्यांच्या सोमवारी लक्षात आले.सदर पदाधिकार्यांनी या दोन्ही नागरी केंद्रात जावून प्रत्यक्ष भेट दिली असता मोठ्या वेतनावर नियुक्त केलेले हे कर्मचारी डॉक्टर नसल्याने रुग्णांची काय सेवा करायची आणि कशी करायची? म्हणून हे कर्मचारी गप्पा मारत बसून होते.डॉक्टर नसलेबाबत विचारले असता, महिनभरापासून डॉक्टर येत नाहीत, त्यामुळे आम्हाला बसून राहण्याशिवाय पर्याय नाही,असे संागितले.यासंदर्भात उपायुक्त संभाजी वाघमारे व हर्षल गायकवाड यांनी भ्रमणध्वनीवरुन विचारणा केली असता,उपायुक्त वाघमारे यांनी पाहून सांगतो असे सांगितले तर उपायुक्त गायकवाड यांनी ट्रेनिंगसाठी बाहेरगावी असल्याचे सांगितले.या केंद्रातील नियुक्त डॉक्टर कशामुळे पसार झाले हे कळायला मार्ग नाही. पण सात डॉक्टरांनी मनपाच्या सेवेला हात दाखविला असल्याचे समजले.
एकूण काय तर मनपाच्या कोणत्याही सेवेला चांगला आरंभ झाला की,त्याला अटकाव करण्याचे कारस्थान होतेच,तशाच प्रकारे सर्वसामान्य,गरीबांना या नागरी आरोग्य केंद्रातून मिळत असलेली चांगली रुग्णसेवा या अनेक नागरी केंद्रातून ठप्प झाल्याने सामान्य रुग्णांचे हाल होत आहेत,हे चकरा मारत आहेत,तेव्हा महापौर, आयुक्तांनी या गैरसोयीची दखल घेवून,संबधित नागरी आरोग्य केंद्रामधून आवश्यक डॉक्टरांची तातडीने नियुक्ती करावी करुन, रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन द्यावी,अशी मागणी लातूर आम आदमी पार्टीने केली आहे.