Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

वाचन,मनन,चिंतन आणि प्रबोधनातून समाज परिवर्तन घडतेःयशवंत भंडारे

 


वाचन,मनन,चिंतन आणि प्रबोधनातून समाज परिवर्तन घडतेःयशवंत भंडारे





लातूर,दि.७ः जगभरातील प्रसार माध्यमांनी लोकशाही मूल्याऐवजी व्यावहारिक मूल्य अधिक टिकवण्यावर भर दिल्याने,लोकशाही  मूल्यांचा र्‍हास होत असल्याचे सांगून,वाचन संस्कृती मानवी मनोबल वाढविण्यासाठी आवश्यक आहे, किंबहुना वाचन,मनन,चिंतन,प्रबोधनातून समाज परिर्वतन होते ,असे प्रतिपादन  विभागीय माहिती उपसंचालक यशवंत भंडारे यांनी येथे केले.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्कवर  महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्ष विभाग, ग्र्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी,लातूर यांच्यावतीने दि.७ व ८ मार्च दरम्यान येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क वर,आयोजित  जिल्हा ग्रंथोत्सव २०१९ च्या  आज शनिवारी  पहिल्या दिवसाच्या दुसर्‍या सत्रात, समाजः प्रसार माध्यमे आणि वाचन या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षपदावरुन भंडारे बोलत होते. मंचावर लोकसत्ताचे जिल्हा प्रतिनिधी प्रदीप नणंदकर, साहित्यिक विवेक सौताडेकर, प्रा.डॉ.दत्ता होनराव हे वक्ते उपस्थित होते.प्रारंभी वक्त्यांचे ग्रंथभेट देवून स्वागत करण्यात आले.
जगात मानवी मूल्ये घेवून वृत्तपत्रे आली  पण त्यात सामाजिक  मूल्ये पाळली जात नाहीत,माहिती देणे, मनोंरंजन करणे आणि प्रबोधन करणे ही माध्यमांची भूमिका हवी पण हल्ली  केवळ मनोरंजन केले जात आहे,माहिती देणे आणि प्रबोधन करणे बाजूला पडले आहे, माहिती आणि प्रबोधनाकडे दुर्लक्ष केले जात आहे,असे सांगून  यशवंत भंडारे यांनी जगभरातील प्रसार माध्यमांच्या निर्मितीचा विस्तार आणि आज त्याला आलेलेे स्वरुप यावर प्रकाश टाकला. लोकशाही वाढविण्यासाठी  वृत्तपत्रांनी काम केले पाहिजे. वृत्तपत्रात काम करणार्‍या घटकांनीही वाचन केले पाहिजे,त्याशिवाय त्याला प्रश्‍न ,माणसं कळणार नाहीत असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना प्रदीप नणंदकर यांनी समाज माध्यमे  ही, समाजाला दिशा देण्याचे काम करतात,त्यासाठी या क्षेत्रातील लोकांचेही वाचन वाढले पाहिजे. आपल्या ज्ञानाची कक्षा वाढविण्यासाठी सर्वच स्थरातील जाणत्या व्यक्तीशी मैत्री करावी,आज वृत्तपत्रातून समाजाला सजग करण्याऐवजी वाचकाला हवे ते दिले जातेय.नवीन पिढीला साचेबध्द  ज्ञान दिले जातेय.घरामधूनही वाचन नाही,समाजात घडणार्‍या चांगल्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत, माणूस स्वतःपुरता प्रिय होत आहे. मोठी माणसं वाचतात पण आचरण करत नाहीत, समाज चुकत असेल तर निर्भिडपणे त्याला विरोध करण्याचे धाडस आले पाहिजे,असे मतही नणंदकर यांनी व्यक्त केले.
प्रा.डॉ.होनराव म्हणाले की, समाज माध्यम हे विज्ञान आहे,समाज माध्यमांमुळे वाचन संस्कृतीचा विकास होतो ,वाचनाचा वेग वाढतो, मात्र त्याचा उपयोग करुन घेता आला पाहिजे,समाज माध्यमांना दोष देण्यापेक्षा ते दुधारी शस्त्र असल्याने त्याचा अधिक परिणाम कसा होईल ते पाहावे,खरे तर प्रसार माध्यमांमुळे लोकशिक्षणाची ही मोठी सुविधा झाली आहे.लोकांचा आवाज त्यातून  कळतो,  लोकांच्या भाव भावना दाबून टाकल्यास त्या अधिक हिंसक बनतात, असा अनुभव आहे,असेही मत त्यांंनी व्यक्त केले.
विवेक सौताडेकर यांनी प्रसार माध्यमातील घटकांनी वाचनाची आवाका वाढवावा,एखाद्या बातमीतून चुकीची माहिती पुढे येवून अनर्थ घडणार नाही, वा कोणाच्या जीवावर बेतणार नाही,याची खबरदारी घेतली पाहिजे.डॉक्टर, वकील,इंजिनिअर वा अन्य घटक चुकले तर समाज त्यांना माफ करतो मात्र शिक्षक आणि पत्रकार यांना माफी नाही, कारण तो समाजाला योग्य आणि खरी माहिती देतो,दिली पाहिजे असा संकेत आहे,याची भान ठेवले पाहिजे.इलेक्ट्रॉनिक मिडीयातून मोठ्या प्रमाणात अंधश्रध्दा पसरविण्याचे काम चालू आहे, माहिती प्रबोधनापेक्षा संभम्र निर्माण केला जातो आहे, याबद्दल सजग असले पाहिजे असेही म्हणाले.
या सत्राचे प्रास्ताविक  जिल्हा ग्रंथालयाचे सोपान मुंढे यांनी केले, सूत्रसंचालन पी.सी.पाटील व शैलजा कारंंडे यांनी केले. तांत्रिक सहाय्यक ह.रा.डेंगळे यांनी केले. या सत्राला ग्रंथालय कर्मचारी,पदाधिकारी,साहित्यिक, व वाचन मोठ्या संख्येने उपस्थित होते.



 


Previous Post Next Post