करोना विषयी उपायांच्या प्रचारापलीकडे शासनाला महत्वाची भूमिका का बजवावी लागणार आहे, यावर अभ्यासपूर्ण भाष्य करणारा लेख
दै.महाराष्ट्र टाईम्स मध्ये डाॅ.अमोल अन्नदाते यांचा " करोना प्रतिबंध आणि शासन " या शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेला लेख वाचला.देशात व राज्यात 'करोना' टाळण्यासाठी स्वच्छतेच्या मुलभूत नियमांचा पुरेसा प्रचार झालेला असला तरी या उपायांच्या प्रचारापलीकडे शासनाला महत्वाची भूमिका का बजवावी लागणार आहे यावर अभ्यासपूर्ण भाष्य करणार्या या लेखाचा गोषवारा असा:—
करोनाची साथ चीनमधून इतर देशात पसरली.चीनने लोकाना आयसोलेशन व विलगीकरणासाठी (क्वारनटाइन) बळजबरी केल्यामुळे भयभीत झालेले लोक पुढे आले नाहीत त्याचा साथीचे नियंत्रण करण्यावर अनिष्ठ परिणाम झाला. चीनमध्ये करोनाची साथ सुरू होताच ,आपल्या देशात साथ पसरण्यापूर्वीच त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी, सिंगापूर व दक्षिण कोरिया या देशानी आपापल्या देशातील शहरात, स्र्कीनिंग व निदान करण्यासाठी डायग्नोस्टीक किट्स मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिल्या एवढेच नाही तर गाड्या थांबताच तिथेही करोनाची चाचणी करण्याची सोय केली होती. तशीच जय्यत तयारी भारताने करण्याची खरी आवश्यकता होती. पण देशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आधीच गाळात गेलेली असल्यामुळे अपेक्षाची पूर्ती होऊ शकली नाही. आजमितीस राज्यातील करोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे, सध्या असलेली करोना तपासणी केंद्रे आणि आयसोलशन वाॅर्ड्स कमी पडण्याची दाट शक्यता आहे.राज्यात ३९ ठिकाणी असलेले आयसोलेशन कक्ष तसेच मुंबई शहरासाठी कस्तुरबा रूग्णालयात असलेल्या ५८ खाटा व इतर ३० खाटा यांची संख्याही खूपच अपूरी आहे. अायसोलेशन वाॅर्ड नेमका कसा असला पाहिजे याचा शास्रशुद्ध अभ्यासही गरजेचा आहे.किमान दोन बेड मधील एक मीटरचे अंतर, दोन बेड मध्ये पार्टीशन नाही तर किमान रूग्णाला तपासताना डाॅक्टर व पॅरामेडिकल स्टाफसाठी वेगळे प्रतिबंधक साहित्य, इत्यादी प्राथमिक मार्गदर्शक तत्वांचा अवलंब होणे आवश्यक आहे.आयसोलेशन व विलगीकरण यासाठी एकच रूग्णालय वापरणे घातक ठरत असल्यामुळे, साथ पसरण्याआधीच विलगीकरणासाठी वेगळी समांतर यंत्रणा निर्माण करण्याची,तसेच आयसोलेशन किती दिवसासाठी यावर तज्ज्ञांचे मत घेऊन शासनाने योग्य तो निर्णय घेण्याची आवश्यकता असते.प्राप्तपरिस्थितीत किती रूग्ण सापडेस्तोवर नेमक्या कुठल्या उपाययोजनांना प्राधान्य व भर द्यायचा या विषयी शासन सध्या गोंधळून गेलेले दिसते.आज महाराष्ट्रात केवळ तीन ठिकाणीच तपासणीची सोय आहे.उद्या ग्रामीण भागात ही साथ पसरली तर तेथील डाॅक्टरांनी अशा रूग्णांला आयसोलेशनसाठी नेमके कुठे पाठवायचे याची नीट माहिती कोणालाही नाही.सध्या करोना रूग्ण सापडलेल्या भागात, आम्ही बळजबरीने लोकांना आयसोलेट किंवा विलगीकरण करू असे विधान आरोग्यमंत्री किंवा अन्य कोणत्याही मंत्र्यांनी करणे लोकांमध्ये अजून खबराट पसरवणारे ठरणार आहे.त्यापेक्षा "त्रास होत असल्यास व करोनाग्रस्तांशी संपर्क आला असल्यास तुम्ही बिनदिक्कत पुढे या, आम्ही तुमची काळजी घेऊ " हे वारंवार शासनाने सौम्यपणे सांगण्याची खरी गरज आहे.
करोनामध्ये सर्दी हे मुख्य लक्षण नसून कोरडा खोकला,ताप, आणि श्वास घेण्यास त्रास ही मुख्य लक्षणे असल्यामुळे सर्दी, खोकला, म्हणजे प्रत्येक वेळी करोना असेल असे नागरिकांनी गृहीत धरू नये तसेच त्यांनी आयसोलेशनलाही मुळीच घाबरू नये.हा आजार व्हायरल असल्याने इतर व्हायरल सारखा आपोआप बरा होणारा आहे.ज्या केसेस गंभीर होतील त्यांच्या उपचारांसाठीची मार्गदर्शक तत्वे आहेत. शासन हे सर्वाच्या भल्यासाठीच उपाययोजना करत आहे हे नागरिकांनी लक्षात घेण्याची व यंत्रणेला साथ देण्याची गरज आहे.सध्या मास्कचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे.परंतू अशा स्थितीत तो कुचकुमी ठरतो.मास्क हा निरोगी व्यक्तीला इतराच्याकडून संसर्ग होऊ नये यासाठी नसून आजारी व्यक्तीकडून तो इतरांना होऊ नये यासाठी असतो.मास्कची जागा खरे तर 'हात धुण्याने' घ्यायला हवी.त्यासाठी सार्वजनिक ठिकाणी पाणी आणि लिक्विड साबण उपलब्ध करून देणे व लोकांना हात धुण्याची पद्धत शिकविण्याची गरज आहे. करोनासाठी औषध नाही असा टाहो फोडण्यापेक्षा, बाधा झालेल्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन इनविट्रो क्लिनिकल ट्रायल ( रूग्णांवर नव्हे )सुरू करण्याची गरज आहे. ज्यांना करोनाबाधित रूग्णांशी थेट संपर्क आला आहे आणि ज्यांनी करोनाची साथ असलेल्या देशात एक जानेवारी नंतर प्रवास केला आहे त्यांनाच चाचणीची गरज आहे. कोणाची चाचणी करायची हे ठरविण्यासाठी तालुकानिहाय लक्षणांचे स्र्कीनिंग केंद्र उभारणे गरजेचे आहे.शासन जितक्या आक्रमकपणे आणि विचारपूर्वक साथ नियंत्रणाचे,प्रतिबंधाचे काम करील तेवढे नुकसान कमी होणार आहे.अर्थात शासनाने केवळ 'घाबरू नका' असे सांगताना सोबत ठोस कृती करण्याची खरी गरज आहे.सुरूवातीच्या काळात कोरोनाचा बर्याच लोकांना संसर्ग होऊन आणि कदाचित थोडी हानी होऊन करोना विरोधात हळूहळू सामूहिक प्रतिकारशक्ती विकसित होईल हे मात्र तितकेच खरे !डाॅ.अमोल अन्नदाते यांनी करोनासारख्या जगभरात थैमान घालणार्या संवेदनशील विषयावर लेखात तपशीलात केलेले हे विवेचन-विश्लेषण संबंधित सर्व घटकांना सुयोग्य मार्गदर्शन करणारे ठरते.
—————
पत्रकार- अरूण दीक्षित.
खोपोली. (९४२२६९४६६६/८१६०१०५९४०)