धर्माच्या बाजूने व धर्माच्या विरोधात पोस्ट लिहिणार्यांचा धंदा सध्या जोरात सुरू आहे.यावर आभ्यासपूर्ण लेख
संपादक सचिन परब यांच्या 'कोलाज डाॅट इन 'या वेबलिंकवर "कोरोनाचा आणि धर्माचा संबंध लावणार्यांचं काय करायचं बरं ? या शिर्षकाखालील,लेखक तथा वारकरी कीर्तनकार ज्ञानेश्र्वर बंडगर यांचा लेख वाचला. जगभर थैमान घालणार्या कोरोना व्हायरसचा नायनाट करण्याच्या दृष्टीने, धर्माच्या बाजूने व धर्माच्या विरोधात पोस्ट लिहिणार्यांचा धंदा सध्या जोरात सुरू आहे.प्रत्यक्षात हा धंदा कसा निरर्थक ठरतो व धर्माचा आणि कोरोनाचा काहीही संबंध नसणार्या कोरोनासारख्या रोगांचा सामना आधुनिक विज्ञानाच्या सहाय्यानेच का करावा लागणार आहे हे सोदाहरण स्पष्ट करणार्या या अभ्यासपूर्ण लेखाचा गोषवारा असा:—*
कोरोनाच्या खबरदारीचे उपाय आमच्या धर्माने आधीच सांगितले आहेत.कोरोनाचं भाकीत ज्ञानेश्र्वरांनी सातशे वर्षापूर्वी सांगून ठेवलं होतं असं काहीजण रेटून खोटं सांगतायत. आपल्या धर्माच्या गौरवासाठी खोट्या गोष्टींचा आधार घेत आहेत.ज्ञानेश्र्वरीतील ओव्यांमध्ये कुठेही विषाणूच्या प्रसाराने आजार फैलावेल असं म्हटलेलं नाही.खरं पाहता ओव्यांच्या भाषाशैलीवरून त्या ज्ञानेश्र्वर महाराजांच्या ओव्या नाहीत हे स्पष्टं आहे.काही जण त्या ओव्या रामदासस्वामींच्या नावे फिरवतायत. युद्धामुळं विषवायू पसरेल असं या ओव्यांमध्ये म्हटलंय.विषवायू आणि विषाणूमध्ये खूप मोठा फरक आहे.विषाणू हा सजीवसदृश मायक्रोआॅरगॅनिझम अाहे.विषाणू वायूमार्फत पसरत नाही.तो कडक पृष्ठभागावर स्थिरावतो हे महाराष्ट्र राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डाॅ.प्रदीप आवटे यांनी स्पष्ट केले आहे.थोडक्यात ओव्यांचा कसाही अर्थ काढला तरी त्यातून कोरोनाचं भाकीत स्पष्ट होत नाही.अनेक जण कोरोनावर गोमुत्राचा हास्यास्पद उपाय सुचवून त्याद्वारे धर्माचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.वारकरी परंपरेतील थोर संत सावता महाराज तापाने गेले.तुकाराम महाराजांच्या पत्नी रखुमाई दम्याच्या आजाराने गेल्या.स्वतः तुकाराम महाराज ताप आल्यामुळे वारीला गेले नाहीत.तेव्हा त्यांनी पांडुरंगाला निरोप दिल्याचे अभंग आजही उपलब्ध आहेत. आजाराच्या काळात वारी चुकली तरी ते पाप मानलं जात नाही. शरीराच्या रोगनिवारणासाठी धर्माच्या आधारावरील सकाम भक्ती किमान वारकरी परंपरेला मंजूर नाही यांचा या मंडळीना सोईस्कर विसर पडला आहे असे खेदाने म्हणावे लागत आहे.तर दुसरीकडे काहीजण धर्म आणि मंदिरं कोरोना संपवू शकत नसल्यामुळं,धर्माची आणि मंदिराची गरज संपली असून खरी गरज डाॅक्टर व हाॅस्पिटलची आहे असा दावा करणारे मेसेज सोशल मीडियावर पाठवताना आढळत आहेत.वास्तविक पाहता धर्माचा आणि रोगाचा आजच्या विज्ञानयुगात काहीही संबंध उरलेला नाही हे निर्विवाद सत्य आहे.
शरीराच्या रोगनिवारणासाठी जशी दवाखान्याची गरज असते तशीच गरज मनातल्या काम,क्रोध,अहंकारादी वासनाविकारांवर मात करण्यासाठी मंदिर, मशीद, विहार,चर्च या सारख्या प्रार्थनास्थळांची गरज असते.रामेश्र्वर भटजींच्या अंगाचा वर्णाभिमानाचा दाह तुकोबारायांच्या अभंगानी शांत झाला होता.आताही खोट्या जातिधर्माच्या अभिमानाचा दाह शांत करण्यासाठी संतवचनांची गरज आहे.धर्म आणि वैद्यकशास्र ही दोन वेगळी क्षेत्रं असून दोघांचीही समाजाच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी गरज आहे. त्यामुळे थैमान घालणार्या कोरोना व्हायरसवरून,धर्म आणि मंदिरं रोगनिवारण करू शकत नाहीत म्हणून त्यांची गरज संपली असं म्हणणंही रास्त ठरत नाही.मंदिरात अलीकडे जशा काही चुकीच्या गोष्टी घडतात तशाच चुकीच्या गोष्टी हाॅस्पीटलमध्येही घडताना आढळतात हे विसरून चालणार नाही.त्यासाठी दोन्ही ठिकाणच्या जबाबदार व्यक्तीना जाब विचारायला हवा पण या दोघांचीही समाजाला गरज आहे हे समजून घेणे तितकेच आवश्यक आहे. डाॅक्टर,हाॅस्पीटल, शारिरीक रोगांवर तर धार्मिक प्रार्थनास्थळे वासना विकारांवर उपचार करण्यासाठी हवेत. म्हणूनच कोरोनाचा आणि धर्माचा संबंध जोडता येत नाही.कोरोना रोखण्याची उत्तर धर्मात शोधणं,किंवा कोरोना रोखण्याची हिंमत धर्मात नाही म्हणून धर्म सोडण्याचा अथवा मंदिर नाकारण्याचं आवाहन करणं,हे आजच्या विज्ञानयुगात मूर्खपणाचं ठरणार आहे.समाज दोन्ही बाजूंनी निरोगी राखण्यासाठी आध्यात्म आणि विज्ञान दोघांचा आधार घ्यावा लागेल. आध्यात्माला नितीशी आणि भक्तीला कष्टाशी जोडण्यासाठी संतपरंपरा मदतकारक ठरेल यात तीळमात्रही शंका नसावी. तेव्हा कोरोना व्हायरसचा समुळ नायनाट विज्ञानाच्या सहाय्यानेच होणार हे मात्र निश्र्चित. वारकरी कीर्तनकार ज्ञानेश्र्वर बंडगर यांनी लेखात केलेले हे अभ्यासपूर्ण विवेचन-विश्लेषण खरोखरच उल्लेखनीय व अंतर्मुख करणारे ठरते हे मात्र तितकेच खरे !
———————पत्रकार
अरूण दीक्षित. खोपोली. (९४२२६९४६६६/८१६०१०५९४०)