Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

हा कसला लॉकडाऊन अन कसला हा लातूरकारांचा बेजबाबदारपणा......सतीश तांदळे, पत्रकार

 


हा कसला लॉकडाऊन अन कसला हा लातूरकारांचा बेजबाबदारपणा.....


कोरोना विषाणूचा जगातील इतर देशांवर झालेला दुष्परिणाम आणि मानवहानी पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. अशा परिस्थितीत नागरिकांनी शासकीय आदेशांचे आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य असते. मात्र या आपत्कालीन लॉकडाऊन संकल्पनेचा देशातील काही हौशी, बेजबाबदार नागरिकांनी फज्जा उडविल्याचे चित्र देशभर पाहायला मिळत आहे त्यात आपण लातूरकर कसे मागे राहू हेच रस्त्यावरील वाहनांची वाढत चाललेली गर्दी यावरुन दिसून येते. विनाकारण रस्त्यावर उतरून नेमकं काय साध्य होणार  हे नं उलगडणारे कोडे प्रशासनास लवकरच सोडवावे लागेल अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही.


देशभरातील कोरोनाबाधित रुग्णांची झपाट्याने वाढत चाललेली संख्या यासोबतच विषाणू संक्रमानाची गती, मृतांची संख्या पाहता येणारा काळ चिंताजनक ठरणार आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत एकही कोरोनाबधित रुग्ण आढळून आला नाही ही एक सकारात्मक बाब असली तरी या विषाणूचा संसर्ग आणि संक्रमण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, आरोग्य विभाग, महानगरपालिका यांच्यावतीने युद्धपातळीवर कार्य केले जात आहे.  या कठीण काळात नागरिकांनी प्रशासनाला मदत करणे अपेक्षित असताना विनाकारण रस्त्यावर उतरून गर्दी केली जात आहे. कसल्याही प्रकारची काळजी न घेता बेजबाबदारपणे शासकीय कार्यात अडथळा आणण्याचे प्रयत्न नकळतपणे का होईना पण केले जात आहेत. नागरिकांनी फक्त घरीच थांबावे, घरातल्या लहान मुलांची आणि वयोवृद्ध नागरीकांची विशेष काळजी घ्यायची आहे. लॉकडाऊन हा कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्याचा एकमेव पर्याय असल्याचे जागतिक स्तरावर सिद्ध झाले आहे.
 
जात, धर्म, पंथ, वर्ण, राज्य आणि देशापलीकडे जाऊन मानवजातीच्या अस्तित्वासाठीची ही लढाई नक्कीच आपण जिंकणार आहोत. फक्त एक सुजाण नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य पार पाडू. यापुढील दोन आठवडे निर्णायक असून आम्ही घरातून बाहेर पडणार नाही एवढा एकच संकल्प करू या. शासन आपली भूमिका पार पाडत आहे आपणास कसलीही अडचण येणार नाही याची सर्वतोपरी तयारी प्रशासन करीत आहे. 
लॉकडाऊन काळातील सर्व शासकीय आदेश आणि नियम पाळू या आणि कोरोनाला हरवू या!!!!


सतीश तांदळे
पत्रकार
९८२२९९२०३२
लातूर


Previous Post Next Post