Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

विरोधी विचार मांडण्याचा अधिकार म्हणजे पत्रकारिता होय.- कुलगुरु डॉ.सुधीर गव्हाणे

 


विरोधी विचार मांडण्याचा अधिकार म्हणजे पत्रकारिता होय


-कुलगुरु डॉ.सुधीर गव्हाणे




लातूर,दि.२ः हल्ली संतुलित बाजू मांडणार्‍या आणि परखड  बोलणार्‍या माध्यमांवर दबाव टाकला जात आहे .टीव्ही चॅनेल्स विकत घेतली जात आहेत. तथापि, पत्रकारांनी कुठल्याही दबावाला आणि मोहाला बळी न पडता उदार , निरपेक्ष राहिलं पाहिजे.  वृत्तसमुहांवर तसेच पत्रकारांवर कुठल्याही राजकारणाचा प्रभाव असू नये.विरोधी विचार मांडण्याचा अधिकार म्हणजे पत्रकारिता होय. लोकशाहीची मूल्ये जतन करणं हे पत्रकाराचं कर्तव्य असतं. सद्य परिस्थितीचा अत्यंत सूक्ष्मपणे अभ्यास करण्याची गरज आहे,असे असे सडेतोड मत महात्मा गांधी मिशन विद्यापीठ,औरंगाबादचे कुलगुरु डॉ. सुधीर गव्हाणे यांनी मांडले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र ,लातूरच्या वतीने आयोजित प्रसिद्धी माध्यमे आणि आजची आव्हाने या विषयावर भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात आयोजित परिसंवादाचे प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू डॉ.जनार्दन वाघमारे तसेच मंचावर इतर वक्ते म्हणून प्रदीप नणंदकर, शशिकांत पाटील, विभागीय माहिती उपसंचालक यशवंत भंडारे ,विभागीय माहिती सहसंचालक मीरा ढास आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना कुलगुरु डॉ.सुधीर गव्हाणे म्हणाले की, पूर्वी भारतामध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्था अस्तित्वात होती. त्यानंतर हजारो वर्षानंतर  भारतात लोकशाही आली. वंचितांना अधिकार देणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही होय.परंतु सध्या सत्तेत बसलेले लोक पूर्वीची व्यवस्था आणण्याचा प्रयत्नात आहेत , हे लोकशाहीसाठी घातक आहे. पत्रकार हा नवा प्रवाहपूजक, परिवर्तन वाहक असायला हवा. परंतु हल्ली चुकीच्या धारणा घेऊन आम्ही बोलत आहोत .पूर्वी पत्रकारिता ही ध्येयवादी होती,त्यात व्यावसायाची गणितं
नव्हती.  परंतु हल्ली पत्रकारीता ही ’मिशन टू कमिशन’ झाली आहे. जो पत्रकार ,संपादक जास्त कमिशन मिळवेल ,पैसा कमवेल तो सर्वश्रेष्ठ पत्रकार, संपादक अशी आजची परिस्थिती झाली आहे.पत्रकारिता हा एक गुंतवणूक करून नफा कमविण्याचा उद्योग झाला आहे. लोकशाहीची मूल्ये जतन करणं हे पत्रकाराचं कर्तव्य असतं .आपल्या देशातील महिला सुरक्षा, इथला विजेचा प्रश्न, पाणीप्रश्न ही आजची आव्हाने आहेत.अशा विषयांवर पत्रकारांनी लिहिणं ही काळाची गरज आहे.
गेल्या ९० दिवसात कश्मीरमध्ये काय झालं? तिथल्या नागरिकांवर   का दबाव टाकला जातोआहे. यावर कोणीच पत्रकार का लिहीत नाही ? येथील नागरिकांची मते जाणून घेतली जात नाहीत. येथील नागरिकांवर नियंत्रण राहिले नाही तर ते आतंकवादी होतील. गेल्या कित्येक दिवसांपासून देशात सी. ए .ए. तसेच ्एन.आर .सी.चा प्रश्‍न धुमसत आहे .ठिक-ठिकाणी उपोषणे ,आंदोलने सुरु आहेत लाखो महिला, मुले ,नागरिक रस्त्यावर उतरली आहेत यावर का बोललं जात नाही ? यावर संवाद का होत नाही .लोकशाहीची मूल्ये जपणं तसेच सत्तेवर अंकुश ठेवणं हे पत्रकाराचं कर्तव्य आहे. लोकशाही जिवंत राहिली तरच पत्रकार जिवंत राहील.यासाठी पत्रकारांनी पुढे यायला हवं ही खरी आपल्या देशासमोरील आव्हाने आहेत असेही मत कुलगुरु डॉ.गव्हाणे  यांनी व्यक्त केले.
  याप्रसंगी दुसरे वक्ते पत्रकार प्रदीप नणंदकर म्हणाले की, अमर्याद वाढलेल्या वृत्तपत्रांच्या संख्येमुळे वृत्तपत्रांचा वीट आला आहे .  स्वातंत्र्यापूर्वी माध्यमांमध्ये वृत्त , वसा, ध्येय होतं. आज पत्रकारितेची घसरण होत आहे. दुहेरी दायित्वामुळेत पत्रकारितेत अडचण निर्माण होत आहे. आज वृत्तपत्रात भांडवलदार घुसल्याने पुरती वाट लागली आहे. वृत्तपत्रे चालविणे हा धंदा झाला आहे. सामान्य माणसांऐवजी केंद्रस्थानी नसून मालक हा केंद्रबिंदू झाला आहे. संपादका ऐवजी जाहिरात व्यवस्थापकाची प्रचंड किंमत वाढली आहे. आपली वृत्तपत्रे खपवण्यासाठी सर्रास खोट्या बातम्या दिल्या जातात . पत्रकारिता हा पोटापाण्याचा विषय झाला आहे. ही सगळी जगण्याची लढाई आहे. हल्ली माध्यम संवाद साधत नाहीत पत्रकारितेचा मूळ हेतू हरवत चालला आहे.असे मत त्यांनी व्यक्त केले.
तिसरे वक्ते पत्रकार शशिकांत पाटील म्हणाले की,एका पत्रकारांसाठी व्हिजन , वर्क आणि कमिटमेंट या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. वास्तव रिपोर्टिंग निर्भयपणे करणं हे वर्तमान स्थितीत अत्यंत अवघड काम झालं आहे. आज एखाद्या समस्येच्या मुळापर्यंत जाऊन त्याचं खोल आकलन करणं कमी पडत आहे. सर्वच क्षेत्रात सत्ता, संपत्ती व लालसा वाढली आहे .एका पत्रकारांसाठ विविध भाषांवर प्रभुत्व असणं अत्यंत गरजेचं असतं.आज इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या समोर सोशल मीडियाचे मोठे आव्हान आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पत्रकार हा अत्यंत तत्पर व स्मार्ट असायला हवा. त्याला मल्टिटास्किंग व इलेक्ट्रॉनिक गॅझेट हाताळता यावीत .इलेक्ट्रॉनिक मीडिया हे दुधारी शस्त्र असून पेटती मशाल आहे.हे शस्त्र इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या पत्रकाराला व्यवस्थितपणे हाताळता येणे फार गरजेचे आहे.
अध्यक्षीय समारोपात डॉ. जनार्दन वाघमारे म्हणाले की ,प्रत्येक व्यवसायाचा एक धर्म असतो, तसाच पत्रकारितेचा ही धर्म असतो .त्याचा प्रत्येकाने आव्हाने प्रत्येक काळात असतातच त्याचा प्रत्येकाने स्वीकार करायला हवा. पत्रकारितेची उज्वल परंपरा महाराष्ट्राला लाभलीआहे. स्वातंत्र्यापूर्वीची पत्रकारांसमोर देशाच्या स्वातंत्र्याची आव्हाने होती, आज पत्रकारांच्या समोर वेगळी आव्हाने आहेत .ते पेलण्यासाठी पत्रकारांनी नेहमी सज्ज राहावे असं मत त्यांनी व्यक्त केलं.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे सचिव प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांनी केलं तर सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष साहित्यिक विवेक सौताडेकर यांनी केले व आभार ऍड. मनोहरराव गोमारे यांनी मानले.  कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. शाम आगळे,डॉ.कुसुम मोरे ,रुक्साना मुल्ला , भीम दुनगावे, सुनिता राठोड आदींनी प्रयत्न केले.



Previous Post Next Post