20 एप्रिल पासुन लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील.
*जिल्ह्यांच्या सीमा मात्र कडेकोट बंदच राहतील नागरिकांनीअनावश्यकरित्या घराबाहेर पडू नये
लातूर (प्रतिनिधी) दिनांक १९ :कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या राज्यातील काही क्षेत्रांत २० एप्रिल पासून काही प्रमाणात व्यवहार सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून यात लातूर जिल्ह्याचाही समावेश असल्याचे सांगून ज्या क्षेत्रात थोडीशी सुट मिळालेली आहे ती वगळता इतर क्षेत्रात लॉकडाऊनचे नियम तंतोतंत पाळले जातील. जिल्ह्याच्या सीमा कडेकोट बंद राहतील, असे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.
यासंदर्भाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 20 एप्रिल पासून काही क्षेत्रात लॉकडाऊन मध्ये सुट देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सुचविलेली क्षेत्र वगळता इतर क्षेत्रात लॉकडाऊन कायम राहणार आहे.
जिल्हा कोवीड – 19 मुक्त.
लातूर जिल्ह्यात अद्याप एकही कोवीड – 19 बाधीत रुग्ण सापडलेला नाही. परराज्यातील 8 प्रवासी कोवीड – 19 बाधीत रुग्ण लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचार घेत होते. कालच त्यांची कोवीड – 19 ची दुसरी तपासणीही नकारात्मक आली आहे. त्यामुळे लातूर जिल्हा सध्या कोरोना मुक्त आहे. लातूर जिल्ह्यातील प्रशासन, पोलीस, आरोग्य विभाग, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता व सर्व कर्मचारी तसेच जिल्ह्यातील सुजाण, संयमी जनता यांच्या सामुहीक प्रयत्नातून आपला जिल्हा कोवीड–19 मुक्त राहीला आहे. आगामी काळातही तो आपणाला कायमस्वरुपी या रोगाच्या साथीपासून सुखरुप ठेवायचा आहे. त्यामुळे 3 मे पर्यंत जिल्हावासीयांनी लॉकडाऊनच्या नियमांचे कडेकोट पालन करावयाचे आहे.
या सेवा सुरु राहतील.
राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार आरोग्य सेवेशी संबंधित सर्व आस्थापना आता चालु राहतील. तेथील अधिकारी, कर्मचारी त्यांची ये-जा चालु राहील. शेती संबंधिची कामे यापुढे सुरु राहणार आहेत. मत्स्य व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, वनीकरण व त्यासंबंधीचे कामकाज चालु राहील. बँका, पतसंस्था, एटीएम, विमा कंपन्या, सहकारी पतसंस्था, अनाथालये, वृद्धाश्रम, दिव्यांगगृहे, सामाजीक अर्थसहाय्य योजनांचे वाटप, अंगणवाडीचा घरपोच आहार, ऑनलाईन शिकवणी, रोजगार हमीची कामे, डिझेल, पेट्रोल, गॅस वाहतूक, विद्युत निर्मिती व वितरण, पोष्ट सेवा, पाणीपुरवठा, स्वच्छता, दुरसंचार, दुरध्वनी, इंटरनेट, मालवाहतूक, अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा आदी सेवा व त्यासंबंधीची कामे चालु राहणार आहेत. उद्योजक व कारखाने काही प्रमाणात सुरु करता येतील मात्र त्या कामगारांची काळजी घेऊन त्यांची राहण्याची व्यवस्था तेथेच करावी लागणार आहे. मनपा, नगरपालिका यांच्या हद्दीबाहेरील उद्योग, अत्यावश्यक उत्पादने करणारी उद्योग, कृषीगट आधारीत उद्योग, पायाभुत सुविधा बांधकामे, रस्ते, सिंचन, मनपा-नगरपालिका हद्दीबाहेरील औद्योगीक इमारती जेथे जागेवरच मजुर आहेत त्यांची ये-जा करण्याची गरज नाही अशी बांधकामे, पुर्व पावसाळी कामे, आपतकालीन सेवा, वैद्यकीय मदतीची सेवा, जिल्हा प्रशासन व मनपा आयुक्तांनी परवानगी दिलेल्या कार्यालयीन कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची, राज्यशासन, केंद्रशासन यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची ठरवून दिलेल्या प्रमाणात ये-जा सुरु राहील.
या गोष्टी बंदच राहतील.
लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथीलता असली तरी जिल्ह्याच्या सीमा अत्यावश्यक सेवा वगळून कडेकोट बंद राहणार आहेत. सार्वजनिक विमान, रेल्वे व बससेवा बंद राहणार आहेत. त्यामुळे वैद्यकीय कारण वगळता आंतरजिल्हा व आंतरराज्य प्रवास कोणासही करता येणार नाही. शिक्षण संस्था, खाजगी शिकवणी वर्ग बंदच राहणार आहेत. टॅक्सी, ॲटोरीक्षा, सिनेमागृहे, व्यायामशाळा, क्रीडा संकुल, जलतरण तलाव, मनोरंजनाची साधने, सर्व धार्मीक स्थळे बंदच राहणार असून रस्त्यावर सामाजीक अंतर पाळणे बंधनकारक आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी सुद्धा वीस पेक्षा अधिक लोक एकत्र येणार नाहीत.
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या इतर राज्यातील तसेच राज्यातील कामगारांनी, मजुरांनी आहे तिथेच राहावे त्यांची सर्वोतोपरी काळजी घेतली जाणार आहे. ज्यांना ताप, खोकला, सर्दी अशी लक्षणे असतील त्यांनी तातडीने शासकीय रुग्णालयात तपासणी करुन घ्यावयाची आहे. आपल्या कुटुंबियांच्या, जिल्ह्याच्या सुरक्षेसाठी आपणाला लॉकडाऊनचे नियम 3 मे पर्यंत पाळावयाचे आहेत. हे नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे. याची जाणीव ठेऊनच सर्वांनी आपली जबाबदारी पाळावी असे आवाहन पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले.