Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लॉक डाऊन जाहीर झाल्यापासून नागरिकांनी घरी येणाऱ्या नातेवाईकांची माहिती प्रशासनाला द्यावी

 


लॉक डाऊन जाहीर झाल्यापासून नागरिकांनी
घरी येणाऱ्या नातेवाईकांची माहिती प्रशासनाला द्यावी


लातूर,दि.6:-संपूर्ण देशात कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत 22 मार्च 2020 पासून लॉक डाऊन जाहीर करण्यात आले. व त्याची अंमलबजावणी 23 मार्चपासून तात्काळ सुरू होऊन  14 एप्रिल 2020 पर्यंत लॉक डाऊन राहणार आहे. लॉक डाऊन जाहीरच झाल्यापासून ते आज पर्यंत मुंबई, पुणे व इतर जिल्ह्यातून तसेच परप्रांतातून अथवा परदेशातून आपल्या घरी जे नातेवाईक आले असतील त्यांची माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक आहे. जे लोक अशी माहिती प्रशासनाला देणार नाहीत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले.
          जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात अंगणवाडी सेविका, अशा वर्कर्स व आरोग्यसेविका या घरोघरी जाऊन कुटुंबातील व्यक्तींची माहिती गोळा करत आहेत. त्यामध्ये बाहेरून जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींची माहिती स्वतंत्रपणे घेतली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी लॉक डाऊन जाहीर झाल्यापासून आजपर्यंत त्यांच्या घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तींची माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक आहे. तसेच ते त्यांच्या कुटुंबासाठी व जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात आलेल्या अशा व्यक्तींचे आरोग्य तपासणी आरोग्य विभागामार्फत होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने त्यांच्याकडे आलेल्या नातेवाईकांची( मुले, आई-वडील व भाऊ-बहीण) माहिती प्रशासनाला स्वताहून कळवून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले.
          लातूर शहरातील लातूर महापालिकेच्या वतीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे; तर नगर पालिकेच्या कार्यक्षेत्रात नगरपालिकेच्या वतीने कुटुंबातील व्यक्तींची माहिती घेतली जात आहे. तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या वतीने यापद्धतीने माहिती संकलित केली जात असल्याने प्रशासनाच्या या मोहिमेला जिल्ह्यातील नागरिकांनी स्वतःहून प्रतिसाद दिल्यास प्रशासनाला कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अत्यंत काटेकोरपणे राबवणे सोयीचे होणार आहे, असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले.


Previous Post Next Post