वार्तांकणासाठी गेलेल्या पत्रकाराला औशात पोलीस निरीक्षकांनी दिली धमकी
बातमी छापल्याचा राग मनात धरून अर्वाच्य भाषेचा वापर
औसा/ प्रतिनिधी,
एकीकडे आरोग्य यंत्रणा, प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस, पत्रकार जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या या लढाईत आपले योगदान देत आहेत. पत्रकार जीव मुठीत धरून सर्व अपडेट लोकांपर्यंत पोहोचवून जनजागृतीत महत्वाची भूमिका बजावत असतांना वार्तांकणासाठी गेलेल्या पत्रकाराला मागच्या बातमीचा राग मनात धरून अर्वाच्य भाषेत धमकावून त्याला बतमीपासून रोखल्याचा धक्कादायक प्रकार औशात शुक्रवारी (ता. १०) पाहवयास मिळाला. सूडबुद्धीने पेटून उठलेल्या येथील पोलीस निरीक्षक यांनी तुला फोटो काढण्याचा अधिकार नसल्याचे सांगून ते फोटो डिलीट करायला लावल्याने कोरोनाच्या या लढाईला औशात गालबोट लागले असून या अधिकाऱ्यांच्या विरोधात पत्रकारांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री, आमदार यांच्याकडे तक्रार केली आहे. या बाबत रीतसर अर्ज उपविभागी पोलीस अधिकारी यांना देऊन पोलिस निरीक्षक यांच्या कडून जीविताला धोका असल्याने यांच्यावर योग्य कारवाईची मागणी केली आहे.
शुक्रवारी सकाळी अकरा वाजता बिनकामी फिरणाऱ्या लोकांना पोलीस अडवून त्यांच्यावर कारवाई करीत होते. बाहेर निघालं तर पोलिसांच्या कारवाईला सामोरे जाल ही बातमी करण्यासाठी औशाचे सकाळचे बातमीदार जलील पठाण त्या ठिकाणी गेले त्यांनी कांही फोटो काढले फोटो काढतांना पोलिसांना कुठलाही अडथळा होऊ नये म्हणून त्यांनी रस्त्याच्या कडेला उभे राहून फोटो काढले दरम्यान अचानक पोलीस निरीक्षक नरसिंह ठाकूर आले आणि गाडीतून उतरताच त्यांनी पत्रकारावर लाखोल्यावाहायला सुरू केल्या. तुला फोटो काढण्याचा अधिकार कोणी दिला, माझ्या विरोधात बातम्या करतो तुला आतच टाकतो म्हणत त्यांनी अर्वाच्य भाषेत आपली मागील खुन्नस काढली. वारंवार सांगूनही श्री. ठाकूर यांनी धमकी देणे सुरूच ठेवले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर तुम्हाला बघून घेतो असे म्हणत त्यांनी या पत्रकाराला अर्धा तास रस्त्यावरच उभे केले. बातमी करायची असेल तर माझी परवानगी घेतल्याशिवाय करायचं नाही अन्यथा तुम्हाला दाखवितो अशी धमकी देत त्यांनी काढलेले फोटो डिलीट करायला लावले. मागेही याच अधिकाऱ्याला बदलण्यासाठी पत्रकारांनी आठ दिवस उपोषण केले होते. आता पत्रकारितेपासून रोखून धमकी देणाऱ्या या अधिकाऱ्यावर वरिष्ठांनी कारवाई करावी अशी मागणी पत्रकारांनी केली आहे.