घरमालकांनी भाडेकरूला भाड्यासाठी तगादा लावू नये
पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांचे आवाहन
लातूर (प्रतिनिधी)
कोरोना-१९ आणि लॉकडाऊनमुळे सर्व आर्थिक / व्यवसायिक व्यवहार बंद आहेत. या परिस्थितीत जनतेला आरोग्याच्या समस्येबरोबरच आर्थिक अडचणींनाही तोंड द्यावे लागत आहे . अनेक भाडेकरूंना आपले घर भाडेही देणे शक्य होत नाही, त्यामुळे लातूर जिल्ह्यातील घर मालकांनी आगामी किमान तीन महिने भाडे वसुलीसाठी तगादा लावू नये किंवा भाडेकरूला त्या कारणामुळे घराबाहेर काढण्याची कारवाई करू नये असे आव्हान लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.
या संदर्भाने प्रसिद्धी दिलेल्या निवेदनात पालकमंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे की, सध्या संपूर्ण जगात कोविड १९ च्या साथीने थैमान घातले आहे , या पार्श्वभूमीवर देशात २३ मार्च पासून लॉक डाऊन जाहीर करण्यात आलेले आहे. हे लॉकडाउन आणखी ३ मेपर्यंत वाढवण्यात आले आहे. या लॉकडाऊन मुळे सर्व बाजारपेठा, व्यावसायिक संस्था, कारखाने बंद आहेत. एकूणच सर्व आर्थिक/ व्यावसायिक गतिविधि बंद झाल्या आहेत. याचा सर्वसामान्य जनतेच्या रोजगारावर ही परिणाम झालेला असून अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन बंद झालेले आहे . या अभुतपुर्व परिस्थितीमुळे सर्वसामान्य जनतेला कोविड १९ साथीच्या समस्येबरोबर अत्यंत कठीण अशा आर्थिक अडचणीनाही तोंड द्यावे लागत आहे. आपल्या राज्यात भाड्याच्या घरामध्ये रराहणाऱ्या लोकांचे प्रमाण लक्षणीय असून सध्याच्या आर्थिक अडचणीच्या परिस्थितीमुळे भाडेकरूंना ते राहत असलेल्या घराचे भाडे नियमितरित्या भरणे शक्य होत नाही.परिणामी हे भाडे थकते आहे ही वस्तुस्थिती आहे. या समस्येचा विचार करून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व इतर संपूर्ण मंत्रिमंडळाने राज्यातील घरमालकांनी अडचणीत असलेल्या भाडेकरूंची घरभाडे वसुली आगामी तीन महिन्यासाठी पुढे ढकलावी अशी सूचना केली आहे. या कालावधीत भाडेकरूकडून भाड्याची वसुली झाली नाही म्हणून त्यांना घरातून बाहेर काढू नये अशा सूचनाही केल्या आहेत. या सूचनांचा विचार करता लातूर जिल्ह्यातील घरमालक आपल्या भाडेकरूकडून भाडे वसुलीची सक्ती करणार नाही किंवा त्यांना घराबाहेर काढणार नाही असा विश्वास असल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे.