कोरोनासाठी शासनास केलेल्या मदतीची माहिती धर्मादाय कार्यालयास द्यावी
लातूर/ प्रतिनिधी: कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या आवाहनास प्रतिसाद देत विविध संस्थांकडून आर्थिक मदत केली जात आहे. अडचणीच्या काळात संस्थांकडून केली जाणारी ही मदत योग्य असून अशा संस्थांनी आपण केलेल्या मदतीची माहिती धर्मादाय आयुक्त कार्यालयास द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनामुळे बाजारपेठा बंद असून उलाढाल थंडावली आहे. अर्थचक्राची गती कमी झाली आहे. या संकटकाळात सुरू असणाऱ्या उपाययोजनांसाठी विविध धार्मिक, शैक्षणिक व धर्मादाय संस्थांनी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करावी, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.त्याला प्रतिसाद देत विविध संस्था सढळ हाताने मदत करत आहेत. ही मदत कोरोनाशी लढण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरत आहे.परंतु ज्या संस्था मदत करत आहेत किंवा ज्यांनी अशी मदत केलेली आहे त्यांनी त्याची माहिती धर्मादाय आयुक्त कार्यालयास देणे बंधनकारक आहे.ही माहिती संकलित करून ती राज्य शासनास दिली जाणार आहे.त्यामुळे शैक्षणिक, धार्मिक व धर्मादाय संस्थांनी आपण केलेल्या मदतीची माहिती कार्यालय अधीक्षक महालिंगे ( संपर्क क्रमांक ९६८९२२४७६४ )यांच्याकडे द्यावी. संचारबंदीमुळे कार्यालयात येणे शक्य नसल्यास कार्यालयाच्या ई-मेलवरही ( supdtest.la-mah@gmail.in) माहिती देता येऊ शकते. त्यामुळे संस्थांनी आपली माहिती व्हाट्सअप किंवा ईमेल वरून द्यावी ,असे आवाहन धर्मादाय उपायुक्त श्रीमती यु .एस. पाटील यांनी केले आहे.
Tags:
LATUR