"पुण्यातील लातूरकर" युवक ठरले लातूरच्या विद्यार्थ्यांचे आधार........
पुण्यात शिक्षणासाठी जाणाऱ्या लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. यासोबतच रोजगार, व्यवसाय, मजुरीसाठी पुण्यात गेलेल्या नागरिकांची संख्याही हजारोत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषित झाला आणि खऱ्या अर्थाने लातूरच्या विद्यार्थी, कष्टकरी, मजूर, नोकरदार जे या लॉकडाऊन मध्ये पुण्यात अडकून बसले अशा नागरिकांच्या आणि त्यांच्या लातुरातील कुटुंबीयांच्या चिंतेत वाढ झाली. अशा कठीण प्रसंगी मदतीला धावून आले ते "पुण्यातील लातूरकर". मूळचे लातूरकर असलेले तरुण उदयोजक, नोकरदार युवक, आणि सामाजिक कार्यकर्ते असलेल्या या युवकांच्या समूहाने निस्वार्थ भावनेने पुण्यातील गरजू विद्यार्थ्यांना परत आपल्या गावी पाठवण्याचा निर्धार केला आणि हा निर्धार काही प्रमाणात पूर्णही केला. अशा गरजू विद्यार्थ्यांची यादी करून लॉकडाउनच्या मागील ५० दिवसात त्यांच्या जेवणाची, आरोग्याची काळजीही घेतली. या तरुण युवकांच्या निस्वार्थ सेवेला आता मर्यादा येत आहेत. स्थानिक प्रशासन, लातूरचे लोकप्रतिनिधी आणि समाजातील दानशूर व्यक्तींनी आता पुढे येणे गरजेचे आहे. जेणेकरून या कार्यात त्यांना मदत होईल.
संत तुकाराम महाराजांच्या "एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ" या वचनाने प्रेरित होऊन पुण्यासारख्या महानगरात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या युवकांचे कार्य प्रशंसनीय असेच आहे. फक्त लातूर जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांचीही मदत या तरुणांनी केलेली आहे. या विद्यार्थ्यांना परत गावी पाठविण्यासाठी लागणारे वैद्यकीय प्रमाणपत्र, स्थानिक प्रशासनाचे ना हरकत प्रमाणपत्र, वाहनांची सोय या सर्व बाबी स्वतः पुढाकार घेऊन हे तरुण करीत आहे. या कामी पुण्यातील अनेक स्वयंसेवी संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांचीही मदत घेतली जात आहे. शासन वाहनांची सोय करीत आहे पण विद्यार्थी संख्या पाहता हि मदत कमी पडत आहे त्यामुळे खाजगी वाहनांचा उपयोग करणे आवश्यक झाले आहे. मात्र या खाजगी वाहनांचे भाडे व इतर खर्च पाहता याची सांगड घालणे अवघड झालेले आहे. तरीही नाउमेद न होता हे सर्व तरुण आपल्या परीने मदतीचा हात देत आहेत. महाराष्ट्र शासन, स्थानिक पुणे प्रशासन, लातूरचे सर्व लोकप्रतिनिधी यांनी या गरजू विद्यार्थी, कामगार, मजूर जे लॉकडाऊनमुळे पुण्यात अडकले आहेत त्यांना परत आपल्या गावी पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत अन्यथा अशा नागरिकांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची भीती या समूहातील रवींद्र बारस्कर, ऋषिकेश देशमुख, विशाल पवार, शिवा पाटील या सक्रिय तरुणांनी व्यक्त केली आहे. शासनाने पुण्यातून त्वरित विशेष बसची व्यवस्था करून विद्यर्थ्यांना मोफत गावी जाण्याचे नियोजन करावे अशी मागणीही या युवकांनी केली आहे.
लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील सर्व विद्यार्थी सुखरूप आपल्या गावी, घरी परतावे यासाठी पुण्यातील लातूरकर या तरुण युवकांच्या समूहाने हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास जावो या अपेक्षेसह तमाम लातूरकरांच्या वतीने या सर्व कोविड योध्यांचे अभिनंदन आणि पुढील सामाजिक कार्यास शुभेच्छा. शासनानेही या गंभीर आणि महत्वपूर्ण विषयाकडे त्वरित लक्ष देऊन विशेष वाहनांची सोय करावी हीच अपेक्षा.
सतीश तांदळे , पत्रकार लातूर
९८२२९९२०३२