किमान वेतन आयोगानुसार आरोग्य सेविकांना मानधन देण्याबाबत आयुक्तांना निर्देश
नर्सेस असोसिएशनच्या मागणीची वैद्यकिय मंत्र्यांकडून दखल
लातुर - अर्बन आर.सी.एच. अंतर्गत लातुर मनपात गेल्या 15 वर्षापासून कार्यरत 21 आरोग्यसेविकांना किमान वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार वाढीव मानधन देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश राज्याचे वैद्यकिय शिक्षण व सांस्कृतीक कार्यमंत्री ना. अमित देशमुख यांनी लातुर मनपा आयुक्तांना 21 मे रोजी पत्र पाठवून दिले आहे. मनपामध्ये ठराव झाल्यानंतरही या आरोग्यसेविकांच्या मानधनाचा प्रश्न प्रलंबित ठेवण्याच्या समस्येला नर्सेस असोसिएशनने वाचा फोडून यासंदर्भात कार्यवाहीसाठी वैद्यकिय शिक्षणमंत्री ना. अनिल देशमुख यांना निवेदन पाठविले होते. या निवेदनाची ना. देशमुख यांनी त्वरीत दखल घेतली आहे.
महानगरपालीकेच्या अन्यायकारक धोरणामुळे आर.सी.एच. योजनेअंतर्गत सन 2006 पासून महानगर पालीकेकडे तुटपुंज्या वेतनावर अविरत आरोग्यसेवा देणार्या 21 आरोग्यसेविका उपासमारीच्या खाईत सापडल्या असून मनपाने घेतलेल्या मंजुर ठरावानुसार या आरोग्यसेविकांना कुशल कामगार म्हणून वाढीव मानधन देण्याची मागणी नर्सेस असोसिएशनच्या वतीने संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. कु. माया वाठोरे, जिल्हाध्यक्षा उज्वला सादगिरे व जिल्हा सचिव रुपाली कांगणे यांनी करुन संविधानात्मक पध्दतीने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. सोबतच मनपाने ठराव घेतलेल्या सन 2019 मधील वर्षाच्या तारखेपासून या आरोग्यसेविकांना मानधन मंजुर करावे. याशिवाय वाढीव मानधनाच्या प्रतिक्षेत वय उलटुन गेलेल्या यामधील काही आरोग्यसेविकांच्या कामाचाही विचार करुन त्यांनाही कुशल कामगार म्हणून वाढीव मानधन मंजुर करावे अशा मागण्या दिलेल्या निवेदनातुन मांडण्यात आल्या होत्या. संघटनेच्या या निवेदनाची वैद्यकिय शिक्षण मंत्र्यांनी दखल घेवून या आरोग्य सेविकांना किमान वेतन आयोगानुसार मानधन देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश लातुर मनपा आयुक्तांना केली आहे. गेल्या 15 वर्षापासून कमी मानधनावर इमाने इतबारे सेवा करणार्या या आरोग्य सेविकांच्या समस्येची दखल घेण्यात आल्यामुळे या आरोग्यसेविकांच्या समस्या सुटण्याची आशा निर्माण झाली असून नर्सेस असोसिएशनच्या लढ्याला यश मिळाले आहे