यशवंतराव चव्हाण ग्रामीण रूग्णालयात
कोरोनाग्रस्तासाठी स्वतंत्र उपचार कक्ष
लातूर दि.२१- लातूर शहर आणि जिल्हयात दिवसेंदिवस कोरोना आजाराचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असल्याने कोरोना बाधीत रूग्णावर उपचार करण्यासाठी लातूर येथील एमआयटीच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रूग्णालयात स्वतंत्रपणे शंभर बेडचा अत्याधुनिक सर्व सोयीनियुक्त स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाची एमआयटीचे कार्यकारी संचालक आ. रमेशअप्पा कराड आणि मेडीकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार यांनी पाहणी केली.
कोरोना या आजाराने गेल्या काही महिन्यापासून संपूर्ण देशात हाहाकार माजला असून केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी लॉकडाऊन करून कोरोना आजाराचा संसर्ग वाढू नये याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला तरीही कोरोनाबाधीत रूग्णाची सर्वत्र मोठया प्रमाणात संख्या वाढत आहे. लातूर शहर आणि जिल्हयात दररोज कोरोना आजाराचा संसर्ग व प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने कोरोनाबाधीत रूग्णावर उपचार करण्यासाठी शासकीय यंत्रणेवर वाढता ताण लक्षात घेवून शासनाने लातूर येथील एमआयटीच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रूग्णालयात या आजारावर उपचार करण्याची सुचना केली. त्यानुसार २२ जुलै २०२० पासून कोरोनाबाधीत रूग्णासाठी अत्याधुनिक सोयींसह स्वतंत्र कक्ष निर्माण करून सुरू करण्यात आला आहे.
यशवंतराव चव्हाण ग्रामीण रूग्णालयात कोरोना रूग्णांसाठी स्वतंत्रपणे शंभर बेडची शासनाच्या नियमाप्रमाणे व्यवस्था करण्यात आली असून स्पेशल रूम निर्माण करण्यात आले आहेत. रूग्णांच्या उपचारासाठी तज्ञ डॉक्टरसह इतर कर्मचारी, व्हेंटीलेटर, ऑक्सीजन आदी सुसज्ज ठेवण्यात आले आहे. कोरोना कक्षासाठी डॉ. गजानन गोंधळी आणि डॉ. विशाल भालेराव यांची नियुक्ती करून त्यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या कोरोना कक्षाची एमआयटीचे कार्यकारी संचालक आ. रमेशअप्पा कराड आणि मेडीकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार यांनी पाहणी करून कांही महत्वपूर्ण सुचना केल्या आहेत.