राज्यातील करोना विषाणू चाचणी प्रयोगशाळांच्या कामकाजात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी राज्य, विभागीय व जिल्हास्तरीय नोडल अधिकारी सज्ज
राज्यातील करोना विषाणू चाचणी प्रयोगशाळांच्या कामकाजात अधिकाधिक सुसूत्रता आणणे व या प्रयोगशाळांचे कामकाज अधिक प्रभावीपणे राबविणे, यासाठी राज्यस्तरावर, महसूल विभागस्तरावर, तसेच जिल्हास्तरावर एक नोडल अधिकारी नियुक्त करण्याबाबतचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे..
राज्यातील करोना विषाणू चाचणी प्रयोगशाळांच्या कामकाजात अधिकाधिक सुसूत्रता आणणे व या प्रयोगशाळांचे कामकाज अधिक प्रभावीपणे राबविणे, यासाठी राज्यस्तरावर एक नोडल अधिकारी तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या स्तरावर प्रत्येकी एक नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
*अ) राज्यस्तरीय नोडल अधिकारी :-*
करोना विषाणू चाचणी प्रयोगशाळा संदर्भातील कामकाजासाठी राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून व्यवस्थापकीय संचालक, हाफकिन बायोफार्मास्युटिकल्स लिमिटेड, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
*अ) राज्यस्तरीय नोडल अधिकाऱ्यांनी पार पाडावयाच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या ----*
1) शासकीय व खाजगी करोना विषाणू चाचणी प्रयोगशाळांची संख्या, संपूर्ण राज्यात वाढविण्यासाठी विशेष उपाययोजना करणे.
2) कार्यरत असणाऱ्या सर्व चाचणी प्रयोगशाळा त्यांच्या पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवण्याची खबरदारी घेणे.
3) केंद्र सरकार/आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे चाचण्यांचे प्रमाण अधिकधिक वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे.
4) त्या-त्या जिल्ह्यातील नव्याने उभारण्यात येणाऱ्या व कार्यरत प्रेरकांना उपकरणे व इतर आवश्यक साहित्यांची तसेच मनुष्यबळाची कमतरता भासत असल्यास ते उपलब्ध करून देण्यासाठी सक्षम यंत्रणांकडे पाठपुरावा करणे.
5) करोना विषाणू चाचणी प्रयोगांच्या कामकाजासंदर्भात जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या शंका व अडचणींचे निराकरण करणे, त्यांच्या कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवणे.
6) राज्यातील सर्व प्रयोगशाळांची संख्या व क्षमता विचारात घेवून या सर्व प्रयोगशाळांना प्राप्त नमुन्यांचे यथोचित वाटप होत आहे, याची खातरजमा करणे.
7) एखाद्या प्रयोगशाळेत प्राप्त होणाऱ्या नमुन्यांची संख्या क्षमतेपेक्षा अधिक असू शकते, अशा प्रकरणात प्राप्त झालेले अतिरिक्त नमुने ज्या प्रयोगशाळेकडे प्राप्त होणाऱ्या नमुन्यांची संख्या कमी असेल त्यांच्याकडे पाठविण्यासाठी योग्य तो समन्वय साधणे.
8) करोना विषाणूचा निदानासाठी आयसीएमआर, केंद्र सरकार, डीसीजीआय यांनी मान्यता दिलेल्या सर्व प्रकारच्या चाचण्या व त्यासाठी वापरावयाची संसाधने, कार्यपद्धती इत्यादींबाबत विहित केलेले निकष राज्यातील सर्व प्रयोगशाळांमध्ये अवलंबिले जात असल्याबाबत खातरजमा करणे.
*ब) विभागीय नोडल अधिकारी व त्यांनी पार पाडावयाच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या :-*
1)त्या-त्या महसूली विभागाच्या विभागीय आयुक्तांनी आपल्या महसुली विभागाकरिता नोडल अधिकारी यांची नियुक्ती करणे आवश्यक राहील.
2)असे नोडल अधिकारी हे शक्यतो भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असावेत.
3)समन्वय, देखरेख व नियंत्रण याबाबत जी कामे राज्यस्तरीय नोडल अधिकारी राज्यस्तरावर पार पाडणे आवश्यक आहे. तीच कामे विभागीय नोडल अधिकाऱ्यांनी महसूल विभागस्तरावर करणे आवश्यक राहील.
सर्व विभागीय आयुक्तांनी अशा प्रकारच्या नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यासाठी शासनाने निर्देश दिले आहेत.
*क) जिल्हास्तरीय नोडल अधिकारी :-*
1)संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील करोना विषाणू चाचणी प्रयोगशाळांच्या संदर्भात नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश निर्गमित करणे आवश्यक राहील.
2)मोठ्या लोकसंख्येच्या जिल्ह्यासंदर्भात नोडल अधिकारी हे शक्यतो भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असणे आवश्यक राहील.
3)इतर जिल्ह्यांसंदर्भात नोडल अधिकारी हे स्थानिक प्रशासनातील वरिष्ठ व जबाबदार अधिकारी असणे आवश्यक आहे.
*जिल्हास्तरावरील नोडल अधिकाऱ्यांनी पार पाडावयाच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या---*
1) जिल्ह्यातील करोना विषाणू चाचणी प्रयोगशाळांची संख्या वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे.
2) अशा प्रयोगशाळांच्या चाचण्यांची क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे. जेणेकरून प्रयोगशाळानिहाय चाचण्यांची एकूण संख्या अधिकाधिक वाढेल.
3) या प्रयोगशाळा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहतील याची खबरदारी घेणे.
4) संबंधित रुग्णालयांकडून प्रयोगशाळांकडे रुग्णांचे घेण्यात आलेले नमुने वेळेवर पोहोचतील याबाबत खातरजमा करणे.
5)रुग्णांचे नमुने घेताना विहित नमुन्यातील फॉर्ममध्ये रुग्णाचे नाव, पत्ता तसेच संपर्क क्रमांक अचूकपणे भरण्यात येत आहे, याची खातरजमा करणे.
6) संबंधित रुग्णालय व प्रयोगशाळा यांच्यातील समन्वय अधिकाधिक प्रभावी राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे.
7) जिल्ह्यातील सर्व प्रयोगशाळा पूर्ण क्षमतेने सर्व दिवशी 24 तास कार्यरत राहतील, याची दक्षता घेणे.
8) नमुना प्राप्त झाल्यानंतर कमाल 24 तासात त्याबाबतच्या चाचण्यांचे अहवाल उपलब्ध होतील, यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणे.
9) प्रयोगशाळेतील मनुष्यबळ व संसाधने पर्याप्त प्रमाणात उपलब्ध राहतील,याची दक्षता घेणे.
10) ज्या रुग्णांच्या बाबतीत चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, असे अहवाल संबंधित रुग्णालयाला तात्काळ उपलब्ध होतील, यासाठी आवश्यक उपाययोजना करणे.
11) पॉझिटिव्ह रुग्णांबाबतची विहित नमुन्यातील माहिती आयसीएमआर पोर्टल, सार्वजनिक आरोग्य विभागाचे पोर्टल व अन्य आवश्यक त्या ठिकाणी त्याच दिवशी अपलोड करणे.
12) निगेटिव्ह रुग्णांबाबतची एकत्र यादी तयार करणे व ही यादी त्याच दिवशी संबंधित रुग्णालयांना पाठविणे.
13) ज्या जिल्ह्यातील रुग्णांचे नमुने अन्य जिल्ह्यातील प्रयोगशाळांकडे चाचणीसाठी पाठविण्यात येत आहेत,अशा प्रकरणात योग्य तो समन्वय राखण्याची जबाबदारी संबंधित दोन्ही जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांची असेल.
अशा प्रकारे विविध स्तरावरील संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी विशेष खबरदारी घ्याव्यात,असे शासनाने निर्देश दिले आहेत.
*मनोज शिवाजी सानप*
*जिल्हा माहिती अधिकारी*
*रायगड-अलिबाग*