लातूर शहर DySp सचिन सांगळे याना तात्काळ निलंबित करण्याची सर्व पक्ष व संघटनांची मागणी
लातूर - प्रतिनिधी
लातूर शहरात गेल्या काही दिवसापासुन पत्रकार मारहाण व अवमान प्रकरणी सार्वजनिक प्रसारमाध्यमांवर शांतीप्रिय व लोकशाहीप्रेमी जनतेचे लक्ष्य ठरलेल्या लातूर शहराचे DYSP सचिन बापु सांगळे यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा अवमान केल्याप्रकरणी तात्काळ निलंबित करण्यात यावे व पत्रकार मारहाण प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत. अशी मागणी आज करण्यात आली. अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री महोदयांना जिल्हाधिकार्यामार्फत लातूर शहरातील सर्व पुरोगामी पक्ष व संघटनांच्या वतीने देण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि 1 ऑगस्ट 2020 रोजी
संपुर्ण देशभरामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 100 वी जयंती ( जन्मशताब्दी) सामाजिक समन्वय वर्ष म्हणुन साजरी केली जात असताना व कोरोनाकाळातही लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्यानी 5 व्यक्तींच्या उपस्थितीत अण्णाभाऊंच्या पुतळ्यास अभिवादन करण्याची परवानगी दिलेली असताना ,DYSP सचिन सांगळे यानी अण्णाभाऊंच्या पुतळ्यास( सोशल डिस्टंसिंग पाळुन )हार घालण्यास व अभिवादनास मज्जाव केला. झाल्या प्रकाराबाबत बातमी बनवण्यास गेलेल्या लातूर प्रभातचे जेष्ठ पत्रकार रघुनाथ बनसोडे यांचाही अवमान केला. गाडीत बसवुन त्यांची धिंड काढली. या पार्श्वभुमीवर लातूर शहरातील सर्व पक्ष संघटनांच्या वतीने सांगळे यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासंबंधी निवेदन देण्यात आले. यावेळी समस्त पुरोगामी पक्ष संघटातर्फे खालील मागण्या करण्यात आल्या (1) बहुजननायक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अवमानप्रकरणी सांगळे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. (2) पत्रकार रघुनाथ बनसोडे प्रकरणी Dysp सचिन सांगळे यांच्याविरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. (3)पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंग घोणे मारहाण प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत सांगळे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत.( 4) शहरातील हॉकर्सचे नेते व पत्रकार मोहसीन खान यांच्यावर गुन्हे दाखल केले मात्र दुसर्या पक्षाच्या वतीने केलेल्या आंदोलकांवर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल न केल्याचा संशय आहे. याविषयीही सखोल चौकशी व्हावी.
(5) DySp सचिन सांगळे यांनी शहरातील अनेक व्यक्तींना विनाचौकशी अटक करून डांबुन गुरासारखी मारहाण केली आहे. याचीही सखोल चौकशी व्हावी व मानवाधिकार उल्लंघन अंतर्गत सांगळे यांच्यावर गुन्हे करण्यात यावे. वरील मागण्या 15/8 2020 पर्यंत मान्य न झाल्यास दि 16 /8/20 रोजी सर्व पक्ष व संघटनाच्या वतीने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ मानवी साखळी करून आंदोलन करण्यात येईल व साहित्यरत्न अण्णाभाऊंच्या पुतळ्यास हार घालुन अभिवादन करण्यात येईल.असा इशाराही प्रशासनाला देण्यात आला. यावेळी शेकापचे जेष्ठ नेते भाई उदय गवारे, रिपब्लिकन सेनेचे प्रा. युवराज धसवाडीकर, संभाजी ब्रिगेडचे Adv. गोविंद सिरसाट, स्वाभिमानी मुस्लीम विकास परिषदेचे मोहसीन खान अखिल महाराष्ट्र कामगार सेना वंचित बहुजन आघाडीचे अमोल बनसोडे, मराठा लिब्रेशन टायगरचे महेश गुंड, आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ते ( AWY ) विक्रांत शंके, युवक क्रांती दलाचे लिंबराज बिराजदार , देवा बाजगुडे, आदिनाथ जाधव आदि उपस्थित होते