पितृऋण फेडण्यासाठी श्रद्धापूर्वक ‘श्राद्धाविधी’ करून पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करा ! - सद्गुरू नंदकुमार जाधव, धर्मप्रसारक, सनातन संस्था
देवऋण,ऋषिऋण, समाजऋण आणि पितृऋण ही ऋणे फेडणे, ही प्रत्येक व्यक्तीची कर्तव्ये आहेत, असे धर्म सांगतो. पितृपक्षात ‘पितृऋण’ फेडण्यासाठी श्राद्धविधी करणे आवश्यक असते; मात्र सध्या अनेक हिंदूंमधील धर्मशिक्षणाचा अभाव, तथाकथित बुद्धीप्रामाण्यावाद्यांचा अपप्रचार आणि हिंदु धर्माला गौण लेखण्याची वृत्ती यांमुळे श्राद्धविधीकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. ‘राजा भगिरथ’ यांनी पूर्वजांच्या मुक्तीसाठी केलेली कठोर तपश्चर्या, तसेच त्रेतायुगात प्रभू रामचंद्रांच्या काळापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही श्राद्धविधी केल्याचे उल्लेख आढळतात. आजही अनेक पाश्चात्य देशांतील सहस्त्रावधी लोक भारतातील तीर्थक्षेत्री येऊन त्यांच्या पूर्वजांना पुढील गती मिळावी, म्हणून श्रद्धेपूर्वक श्राद्धविधी करतात. हिंदूंनीही तथाकथित पुरोगाम्यांच्या श्राद्धाविषयीच्या कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता कोरोना महामारीच्या काळातही शासनाचे सर्व नियम पाळून स्वतःच्या क्षमतेनुसार पितृऋण फेडण्यासाठी श्रद्धापूर्वक ‘श्राद्धविधी’ करावेत आणि आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, असे आवाहन सनातन संस्थेचे धर्मप्रसारक सद्गुरू नंदकुमार जाधव यांनी केले. ते गणेशोत्सवानंतर प्रांरभ होत असलेल्या पितृपक्षाच्या निमित्ताने ‘पितृपक्षातील श्राद्ध महिमा, शास्त्र आणि शंकानिरसन’ या विषयावरील विशेष ‘ऑनलाइन’ कार्यक्रमात बोलत होते. हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. हा कार्यक्रम फेसबूक आणि यूट्यूब च्या माध्यमांतून 15275 लोकांनी प्रत्यक्ष पाहिला, तर 22300 लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोचला.
या कार्यक्रमात जिज्ञासूंना मार्गदर्शन करताना सद्गुरू जाधव पुढे म्हणाले की, ज्यांना शक्य आहे त्यांनी पुरोहितांना बोलावून श्राद्धविधी करावा; मात्र जेथे कोरोनामुळे पुरोहित वा श्राद्धाच्या सामुग्रीअभावी श्राद्ध करणे शक्य न झाल्यास आपद्धर्म म्हणून संकल्पपूर्वक ‘आमश्राद्ध’, ‘हिरण्यश्राद्ध’ किंवा ‘गोग्रास अर्पण’ करू शकतो. आमश्राद्धामध्ये आपल्या क्षमतेनुसार धान्य, तांदूळ, तेल, तूप, साखर, बटाटे, नारळ, 1 सुपारी, 2 विड्याची पाने, 1 नाणे इत्यादी साहित्य तबकात ठेवावे. ‘आमान्नस्थित श्री महाविष्णवे नमः’ हा नाममंत्र म्हणत त्यावर गंध, अक्षता, फूल आणि तुळशीचे पान एकत्रित वहावे. ते साहित्य पुरोहित, वेदपाठशाळा, गोशाळा अथवा देवस्थान यांना दान करावे. ते न जमल्यास हिरण्यश्राद्धाप्रमाणे आपल्या क्षमतेनुसार व्यावहारिक द्रव्य (पैसे) एका तबकात ठेवावेत. ‘हिरण्यस्थित श्री महाविष्णवे नमः’ असे म्हणून ते अर्पण करावे. ज्यांना हे दोन्ही श्राद्ध करणे शक्य न नसल्यास त्यांनी गोग्रास द्यावा अथवा गोशाळेला संपर्क करून गोग्रासासाठी म्हणून काही पैसे अर्पण करावेत. आमश्राद्ध, हिरण्यश्राद्ध किंवा गोग्रास समर्पण केल्यानंतर तीळ तर्पण करावे. ज्यांना वरीलपैकी काहीही करता येणे शक्य नसेल, त्यांनी धर्मकार्यासाठी समर्पित एखाद्या आध्यात्मिक संस्थेला अर्पण करावे. तसेच अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी पितृपक्षातच नव्हे, तर नियमितपणे किमान 1 ते 2 तास ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करावा.
आपला नम्र,
*श्री. चेतन राजहंस*
प्रवक्ता, सनातन संस्था,
(संपर्क क्र.: 7775858387)