Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

मनपाच्या वतीने प्रभाग निहाय गणेशमूर्ती संकलन केंद्र

मनपाच्या वतीने प्रभाग निहाय गणेशमूर्ती संकलन केंद्र 


अधिकाधिक नागरिकांनी स्वगृही करावे मूर्ती विसर्जन - महापौरांचे आवाहन

 

गणेश मंडळांनी जनजागृती करिता पुढाकार घ्यावा.


 

लातूर /प्रतिनिधी:कोरोना संकटाच्या काळात संसर्गापासून बचावासाठी गर्दी टाळत नागरिकांनी श्रीगणेशाचे घरीच विसर्जन करावे.  ज्यांना घरात विसर्जन करणे अशक्य आहे अशा नागरिकांसाठी लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरात प्रभाग निहाय गणेश मूर्ती संकलन केंद्र उभारली जाणार आहेत. संकलित केलेल्या मूर्तींचे पालिकेच्या वतीने विधीवत विसर्जन केले जाणार असून त्यासाठी प्रभागनिहाय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती महानगर पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. 

 कोरोनामुळे यावर्षी गणेशोत्सव साजरा करण्यावर अनेक निर्बंध प्रशासनाने घातलेले आहेत.या निर्बंधांचे पालन करून नागरिकांनी शांततेत गणेशाची स्थापना केली असून आनंदात उत्सव सुरू आहे. दि.१ सप्टेंबर  रोजी गणेश विसर्जन होणार आहे. विसर्जनासाठी एकाच दिवशी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले तर त्यातून संसर्ग वाढण्याची भीती आहे. यामुळे नागरिकांनी घरी स्थापन केलेल्या गणरायाचे घरातच विसर्जन करण्याचे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे. काही नागरिकांना घरात विसर्जन करणे अशक्य ठरू शकते अशा नागरिकांसाठी शहरात प्रभाग निहाय गणेशमूर्ती संकलन केंद्र उभारली जाणार आहेत.

   प्रभाग क्रमांक १ व ८ मधील नागरिकांसाठी सिद्धेश्वर मंदिर, प्रभाग २ साठी नांदेड रोड येथील यशवंत विद्यालयाचा परिसर, प्रभाग ३, ४ व प्रभाग ७ साठी स्वामी विवेकानंद चौकातील पाण्याच्या टाकीचा परिसर, प्रभाग क्रमांक ४ व ५ साठी लेबर कॉलनी येथील शिवाजी विद्यालय, प्रभाग क्रमांक ५ व ६  साठी मंठाळे नगर येथील  मनपा शाळा क्रमांक ९, प्रभाग क्रमांक ९  साठी अंबाजोगाई रस्त्यावरील बस स्थानक क्रमांक २, प्रभाग १०  साठी विशाल नगर येथील ग्रीन बेल्ट, प्रभाग क्रमांक ११ साठी शासकीय कॉलनीतील विहिरीचा परिसर, प्रभाग क्रमांक १२ साठी बार्शी रस्त्यावरील पाण्याची टाकी परिसर, प्रभाग क्रमांक १३ साठी दयानंद महाविद्यालयाचे वाहनतळ, प्रभाग १४  साठी सरस्वती कॉलनीतील पाण्याच्या टाकीचा परिसर, प्रभाग क्रमांक १५ व १६  साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, प्रभाग क्रमांक १७ साठी बांधकाम भवन परिसर व प्रभाग क्रमांक १८ साठी शंकरपुरम ग्रीन बेल्ट येथे गणेश मूर्ती संकलन केंद्र उभी केली जाणार आहेत. याठिकाणी संकलन केलेल्या मूर्तींचे विधिवत विसर्जन मनपाच्या वतीने केले जाणार आहे. अशी माहिती मनपा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घरातील गणपतीचे घरीच विसर्जन करावे याबाबत जनजागृती करण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी केले आहे.अपवादात्मक परिस्थितीत ज्या नागरिकांना घरात विसर्जन करणे शक्य नाही त्यांच्याकडील गणेश मुर्ती संकलन केंद्रावर पोचविण्यासाठी गणेश मंडळांनी प्रयत्न करावेत,असे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

 

 निर्माल्य स्वतंत्रपणे द्यावे..

  ज्या नागरिकांना घरी गणेश विसर्जन करणे अशक्य आहे त्यांनी आपल्या मूर्ती संकलन केंद्रावर आणून द्याव्यात. मूर्ती देत असताना श्री गणेशाला अर्पण केलेली फुले, दूर्वा आणि निर्माल्य स्वतंत्रपणे एकत्रित करून द्यावे. निर्माल्य देण्यासाठी कॅरीबॅगचा वापर करू नये. शक्यतो टाकाऊ कागदामध्ये ते एकत्रित करून संकलन केंद्रावर दिले तर पर्यावरणाच्या रक्षणाला हातभार लावता येऊ शकेल, असेही महापौर व उपमहापौर यांनी म्हटले आहे.

 

 गणेश मूर्तींचे विसर्जन घरीच करावे, कमीत कमी मूर्ती संकलन केंद्रावर याव्यात - महापौर   महानगरपालिकेने गणेश मूर्ती संकलन करण्याची पूर्ण तयारी केलेली आहे. संकलन केंद्रही उभारली जाणार आहेत. तरीदेखील स्वतःच्या व समाजाच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी शक्यतो गणेश मूर्तींचे विसर्जन स्वतःच्या घरीच करावे,असे आवाहन  महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी पुन्हा एकदा केले आहे. पालिकेने उभारलेल्या संकलन केंद्रावर कमीत कमी गणेश मूर्ती याव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Previous Post Next Post