सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका,मोहोळ, अक्कलकोट, पंढरपूर व बार्शी या तालुक्यातील 16 हजार 954 जणांना स्थलांतरित करण्यात आले.
सोलापुर प्रतिनिधी/ईमाम जमादार
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. जिल्हा प्रशासनाकडे आज सकाळपर्यंत प्राप्त झालेल्या आकडेवारीनूसार सोलापूर जिल्ह्यातील चौदा जणांचा आतापर्यंत अतिवृष्टीमुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये पंढरपुरातील सात, बार्शीतील दोन, दक्षिण सोलापूरमधील एक, माढ्यातील चार जणांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील 565 गावांना महापूराचा फटका बसला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील भीमा, सीना, नीरा, बोरी, भोगावती, नागझरी या नद्यांसह मोठे ओढे दुथडी भरुन वाहू लागले आहेत. महापूरामुळे जिल्ह्यातील 4 हजार 522 घरांमध्ये पाणी शिरल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. महापुरामुळे 4 हजार 731 कुटुंबातील 16 हजार 954 जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
मोहोळ, अक्कलकोट, पंढरपूर व बार्शी या तालुक्यातील गावांमध्ये एनडीआरएफ, महसूल प्रशासन, पोलिस यांच्यावतीने मोठ्या प्रमाणात बचावकार्य करण्यात येत आहे.
आज सकाळी पासून जवळपास 30 ते 40 जणांचे प्राण वाचविण्यात जिल्हा प्रशासन व एनडीआरएफला यश आले आहे. बार्शी तालुक्यातील बचावकार्य जवळपास पूर्ण झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील ज्या मार्गावरील नदी, ओढे व नाल्यांना पाणी आले आहे, ते मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. महापूराच्या वेढ्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभाग युद्धपातळीवर कामाला लागला आहे. महसूल प्रशासनाची यंत्रणा पूरग्रस्त गावांमध्ये दाखल झाली आहे. बार्शी तालुक्यातील सासुरे येथे युवकाने महापूराच्या धोक्यात तब्बल 12 तास झाडावर आश्रय घेतला. त्या युवकाला आज सकाळी सहा वाजता सुखरूप बाहेर काढण्यात आले. बार्शी तालुक्यातील मुंगशी येथील युवकाला पहाटे 5 च्या सुमारास सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.