मुख्यमंत्री साहेब पंचनाम्यांचे कसले आदेश देताय,तात्काळ हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करा
संतोष नागरगोजे(प्रदेशाध्यक्ष,महाराष्ट्र नवनिर्माण
शेतकरी सेना)
लातूर- मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकण,विदर्भ भागात परतीच्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातल्याने *सोयाबीन,ऊस,कापूस,बाजरी,तूर,मका ,कांदा, द्राक्ष,डाळिंब तसेच भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.या अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या सोयाबीनचे तसेच काढून रानावर वाळणीसाठी पसरविलेल्या सोयाबीनचे पूर्णतः नुकसान झाले आहे.काही भागात तर अतिवृष्टीने आलेल्या पुराने सोयाबीनच्या गंजीही वाहुन गेल्या आहेत.या अतिवृष्टीने कापसाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.कोकणात या मुसळधार पावसामुळे काढणीला आलेले भातपिक धोक्यात आले आहे.अनेक भात खाचरात पाणी साचल्यामुळे भाताच्या लोंब्या पाण्यातच तरंगत आहेत.याचा परिणाम भात उत्पादनावर होणार असून भात शेती संकटात सापडली आहे.पश्चिम महाराष्ट्रात ऊस,फळबागा,भाजीपाला बाजरी सह अन्य पिकांचेही पूर्ण नुकसान झाले.नाशिक जिल्ह्यात द्राक्ष,कांदा तसेच इतर फळबागांचेही नुकसान झाले आहे.*
यासोबतच महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यात शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.तसेच अनेक ठिकाणी जीवितहानीही झाली आहे.या प्रचंड नुकसानामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
खरेतर यावर्षीच्या खरीप हंगामापासूनच शेतकऱ्यांना अनेक संकटांना सोमोरे जावे लागले आहे.सुरुवातीला बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले.त्यानंतर कोरोनामुळे दुधाचे भाव कमी झाल्याने शेतीला जोड असलेला दुग्ध व्यवसाय अडचणीत आला.तसेच यावर्षी कांद्याचे भाव कमी झाल्याने आणि कांदा सडल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला.व त्यानंतर भाव वाढल्यास केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांना परत अडचणीत आणले.तसेच यावर्षी ऐन मूग उडीद काढणीच्या वेळेसही अतिवृष्टी झाल्याने मूग उडीद शेतकऱ्यांच्या हातून निघून गेले.तसेच हंगाम सुरू झाल्याबरोबर पेरलेले सोयाबीनही सततच्या पावसाने उगवून निघाले.हे सर्व नुकसान होत असताना महाराष्ट्रातील शेतकरी टाहो फोडून आपल्याकडे नुकसान भरपाईची मागणी करत आहेत.परंतु प्रत्येक वेळी राज्य सरकारने आम्ही पंचनामे करू,आम्ही नुकसानभरपाई देऊ,आमचे सरकार शेतकरी हिताचे आहे आम्ही लवकरच दूध दराच्या, कांदा दराच्या प्रश्नांवर मार्ग काढू अशी पोकळ आश्वासने दिली.पण प्रत्यक्ष मदत मात्र कधीच केली नाही.आणि आताही महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचे एवढे मोठे नुकसान होवुनही आपण शेतकऱ्यांसमोर पंचनाम्यांचे गुऱ्हाळ मांडत आहेत म्हणजे परत शेतकऱ्यांना वेड्यात काढण्याचे काम आपण करत आहात.
त्यामुळे *मनसेच्या वतीने आम्ही आपणास आवाहन करतोत की आपण पूर्वीप्रमाणे फक्त पंचनाम्यांचे आश्वासन न देता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची ठोस मदत करावी व अनेक संकटांनी घेरलेल्या शेतकऱ्यांना आत्महत्तेपासून वाचवावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करेल याची नोंद घ्यावी*