उत्तर सोलापूर तालुक्यात गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर प्रतिनिधि/ ईमाम जमादार
वडाळा (सोलापूर)दि.22 : रानमसले (ता. उत्तर सोलापूर) येथे शेतकऱ्याने आज स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मुलास निदर्शनास आली. अंगद श्रीरंग माळी (वय 55) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
रानमसले शिवारात गेल्या दोन दिवसांपासून अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे सुरु आहेत. आज पीक विमा कंपनीचे प्रतिनीधीही शिवारात नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करत होते. याच वेळी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. अंगद माळी यांचा मुलगा बालाजी माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडील अंगद माळी यांच्या नांवे 4 वर्षापूर्वी एका खासगी बॅंकेकडून द्राक्षे बागेसाठी 4 लाख 20 हजार कर्ज घेतले होते. साडेपाच एकर जमीन आहे. यंदा अतिवृष्टीमुळे दीड एकर द्राक्षेबागेचे नुकसान झाले आहे. तसेच दोन एकर कांदा पिकाचेही नुकसान झाले आहे. यामुळे बॅंकेचा हप्ता भरु शकले नसल्याने वडील अंगद माळी हे काही दिवसापासून चिंतेत असल्याचे बालाजी माळी यांनी सांगितले.
या घटने संदर्भात सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक एस. एम.माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार गळफास घेतलेल्या अवस्थेत अंगद माळी यांना पुढील तपासासाठी सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले असून डॉक्टरांच्या अहवालानंतरच पंचनाम्याची कार्यवाही पार पडणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
अतिवृष्टीने मोडले कंबरडे
उत्तर सोलापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे कांद्यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडेच मोडले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.