गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट अकृषी आदेश
लातुरात ५ जणांवर गुन्हा दाखल; कोट्यवधींच्या मालमत्तांचे खरेदीखत
लातूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट अकृषी आदेश काढून त्या आदेशाच्या मदतीने कोट्यवधी रुपये किमतीच्या ११ प्लॉटचे खरेदीखत तयार करण्यात आल्याची धक्कादायक बाब लातुरात समोर आली आहे. याप्रकरणी५ जणांविरुध्द शहरातील शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूरपासून ४ ते ५किलोमीटर अंतरावर असलेल्या हरंगुळ परिसरातील ११ प्लॉटच्या (दस्त क्र. २७१, २७२,२७३, २७४, २७५, २७६, २७७, २७८ व २२५३/२०११, ४६४/२०१२ आणि ९७३४/२१) दस्तांची येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करण्यात आली होती. हे दस्त नोंदणी करताना जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरींचे अकृषी आदेश जोडण्यात आले होते. हा प्रकार २०१० पासून सुरू होता. परंतु, नुकताच यातील अकृषी आदेशाची शहानिशा करण्यात आली असता जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे असलेले हे आदेशच बनावट असल्याचे उघडकीस आले. हा प्रकार समोर येताच जिल्हाधिकारी व दुय्यम निबंधक कार्यालयाची फसवणूक केल्या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयातील प्रभारी सहदुय्यम निबंधक (वर्ग २) श्रीनिवास महादेवराव जगदाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून श्रीकांत चंद्रशेखर हिरेमठ (रा. भाग्यनगर, लातूर), सूर्यकांत महादेव खोबरे (रा.हरंगुळ, ता. लातूर) यांच्यावर, तर प्रभारी दुय्यम निबंधक (वर्ग २) सतीश राजेंद्र बनसोडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बालाजी नागनाथ चिकटे, शिवदास रावसाहेब बिडवे व अन्य एक (सर्व रा. हरंगुळ, ता. लातूर) असे पाच जणांवर भारतीय दंड विधान कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ सह कलम ८२ भारतीय नोंदणी कायदा १९०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप डोलारे हे करीत आहेत.