गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
चोरीस गेलेले सोन्याच्या दागिनेसह एकूण 14 लाख 67 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.
चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक.
मुरुड पोलिसांची दमदार कामगिरी
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, मुरुड येथील एक सोन्या चांदीचे व्यापारी दिनांक.23/07/2022 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या ज्वेलर्सच्या दुकानातील कारागिराला दुकानात बसवून जेवण करण्यासाठी घरी गेले होते.दरम्यानच्या वेळेत दुकानातील शोकेसमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने त्यांच्याच दुकानातील कारागीर सुग्रीव उर्फ बाळूकुमार बावकर, राहणार दत्तनगर, मुरुड याने चोरी करून पळून गेला होता. नमूद व्यापारीने दिलेल्या फिर्यादवरून पोलीस स्टेशन मुरुड येथे गुरनं 219/2022 कलम 381 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केला करण्यात आला होता.
गुन्हा उघडकीस आणण्याचे पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांनी निर्देशित केले होते. त्याअनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर ग्रामीण श्री.सुनिल गोसावी यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे व पोलीस स्टेशन मधील पोलीस अमलदारांचे दोन वेग वेगळे पथक बनवून आरोपीच्या शोधात रवाना करण्यात आले होते. सदरचा आरोपी सतत जागा बदलत असल्याने त्याची माहिती काढून पोलीस पथके विविध ठिकाणी रवाना करून सदर पथकामार्फत आरोपीचा कसून शोध घेण्यात येत होता. सदरचा आरोपी पुणे येथे असल्याची गोपनीय माहिती पोलीस पथकाला मिळाली.मिळालेल्या माहितीवरून पोलीस पथक पुणे येथे रवाना करण्यात आले होते. पोलीस आपल्या मागावर असल्याची चाहूल लागताच नमूद आरोपी पुणे येथून लातूरच्या दिशेने बस मधून पळून जात असल्याचे पोलीस पथकाच्या निदर्शनास आले. त्यावरून दुसऱ्या पथकाने मुरुड बस स्थानकात सापळा लावून पुण्याकडून येणाऱ्या प्रत्येक वाहनावर लक्ष ठेवत होते. तेव्हा नमूद गुन्ह्यातील आरोपी सुग्रीव उर्फ बाळूकुमार बावकर हा मुरुड बस स्थानकात आलेल्या एका बस मधून उतरून तोंड लपवून एका ऑटो मध्ये बसत असताना दिसला.
त्यावरून पथकाने त्याला जागेवरच ताब्यात घेऊन त्याने चोरलेल्या दागिन्याच्या बॅगसह ताब्यात घेऊन पोलीस ठाणे मुरुडला आणून त्याला वर नमूद गुन्ह्यात दिनांक 15/ 08/2022 रोजी अटक करण्यात आली आहे.
नमूद आरोपीने चोरलेल्या 15 लाख रुपयाच्या सोन्याच्या दागिन्यातून 14 लाख 67 हजार 750 रुपयांचे 285 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
सदर कामगिरी श्री.सुनिल गोसावी उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनात व नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे,पोलीस,अंमलदार अतुल पतंगे ,बहादुरली सय्यद, वाल्मीक केंद्रे ,महिला पोलीस अमलदार मंदोदरी पांचाळ यांनी केली आहे.