Ads by Eonads
लातुररोड ते नांदेड नवीन रेल्वे मार्गाच्या उभारणीची मागणी---
खासदार सुधाकर शृंगारे यांनी घेतली केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट.--
लातुर-प्रतिनिधी
लातुर जिल्ह्यातल्या विविध प्रश्नांना घेऊन खासदार सुधाकर शृंगारे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान लातुररोड ते नांदेड या नवीन रेल्वे मार्गाचे तातडीने सर्वेक्षण पूर्ण करून रेल्वे मार्गाची उभारणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. लातूररोड ते नांदेड हा नवीन मार्ग झाल्यास लातूरसह याचा फायदा उस्मानाबाद ,नांदेड , हिंगोली ,परभणी या जिल्ह्यातील जनतेला होणार आहे .
लातुर ते तिरुपती ही नवीन रेल्वे गाडी सुरुवात करण्यात यावी अशी मागणी खासदार सुधाकर शृंगारे यांनी केली आहे, या संदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लातूर जिल्ह्यातून तिरुपती दर्शनासाठी जाणार्या भाविकांची संख्या मोठी आहे . लातूरहून तिरुपतीला थेट गाडी नसल्याने भाविकांना विकाराबाद जंक्शन वरुन प्रवास करावा लागत आहे ,तिरूपतीसाठी रेल्वे गाडी सुरू करावी ही लातूरकरांची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे . या गाडीची गरज लक्षात घेऊन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ही गाडी सुरुवात करण्या सबंधी सर्वेक्ष्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत .
तर लातुर-मुंबई एक्स्प्रेस गाडीला नव्याने एसी बोगी जोडण्यात यावी अशी मागणी खासदार सुधाकर शृंगारे यांनी केली आहे, या गाडीला वातानुकूलित बोगी कमी आहेत , त्यामुळे प्रवाश्यांची अडचण होते आहे . ही मागणी देखील मंजूर करण्यात आली आहे. लातुर रेल्वे स्टेशनवर पीट लाईन उभारण्या बाबतही मंत्री रावसाहेब दानवे यांनी अनुकूलता दर्शविली आहे. लातुर येथे उभारण्यात आलेल्या मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचा शुभारंभ लवकरात लवकर करण्यात यावा ही मागणी देखील खासदार सुधाकर शृंगारे यांनी केली आहे. या बरोबरच चाकूर तालुक्यातल्या जाणवळ येथे भुयारी मार्ग उभारण्याचीही मागणी करण्यात आली आहे. लातुर स्टेशनवरून जाणाऱ्या मात्र कोविड काळात बंद झालेल्या सर्व गाड्या पुन्हा सुरुवात करण्यात याव्यात अशी मागणी खासदार सुधाकर शृंगारे यांनी केली आहे.