जनावरे चोरणारी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश..
9 तास, 350 किलोमीटर पाठलाग करून आरोपींना अटक..
अहमदपूर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना..
याबाबत थोडक्यात हाकिकत अशी की, दिनांक 21 व 22 ऑगस्टच्या दरम्यान मध्यरात्री अहमदपूर पोलीस ठाणे हद्दीत एका वाहनामध्ये काही लोक रस्त्यावरील बेवारस जनावरे भरत असताना पेट्रोलिंग करीत असलेल्या पोलीस जीप मधील पोलिसांना निदर्शनास आले. त्यावरून नाईट पेट्रोलिंग वरील पोलिसांनी विचारपूस करण्याकरिता पोलीस जीप थांबून खाली उतरले तेव्हा जनावराने भरलेला टेम्पो भरधाव वेगात पुढे निघून गेला.नाईट पेट्रोलिंगच्या जीपने वायरलेस वरून पोलीस नियंत्रण कक्ष, लातूर ला माहिती दिली व जिल्ह्यातील सर्व नाईट पेट्रोलिंग पोलिसांना अलर्ट करण्यात आले.जनावराने भरलेला टेम्पो किनगावच्या दिशेने भरधाव वेगात निघून गेल्याने अहमदपूर पोलिसांच्या मदतीकरिता किनगाव हद्दीतील नाईट पेट्रोलिंग वरील पोलिसांना पाठविण्यात आले. समोरून किनगाव पोलिसांनी टेम्पोला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु टेम्पो न थांबता धर्मापुरी कडे निघून गेले. किनगाव व अहमदपूरच्या पोलीस जीप पाठलाग सुरूच ठेवला.
सदरचा टेम्पो परळीच्या दिशेने भरधाव वेगात निघून गेला तेव्हा अहमदपूर पोलिसांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देऊन बीड व परभणी जिल्हा पोलिसांना अलर्ट केले. परळी शहर व परळी ग्रामीण पोलीस स्टेशनला संपर्क करून अहमदपूर पोलिसांच्या मदतीला बोलावून घेतले. समोरून परळी ग्रामीण पोलिसांची पोलीस गाडी येत असल्याचे बघून सदर टेम्पो गंगाखेड तालुक्याच्या दिशेने वळाला. अगोदरच गंगाखेड पोलीस स्टेशनच्या नाईट पेट्रोलिंग वरील पोलिसांना सदरची माहिती दिली होती.त्यावरून गंगाखेड पोलिसांनी सुद्धा नाकेबंदी करून सदर टेम्पोचा शोध घेत होते. तेव्हा गंगाखेड पोलिसांची गाडी समोर दिसल्याने सदरचा टेम्पो राणीसावरगाव कडे निघाला. सदर टेम्पोच्या मागे किनगाव ,अहमदपूर, परळी शहर,परळी ग्रामीणचे पोलीस पाठलाग करतच होते. सदरचा टेम्पो राणीसावरगाव कडे भरदाव वेगात जात असल्याने अहमदपूर पोलिसांनी राणीसावरगाव पोलीस स्टेशनला संपर्क करून नाकाबंदी लावण्यास सांगितले. पिंपळदरी पोलीस स्टेशन व राणीसावरगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी रस्त्यामध्ये पोलीस गाडी आडवी लावून तो टेम्पो थांबवण्याचा प्रयत्न केला.
सदर पाठलाग चालू असताना दिवस उजळले होते. सदरच्या टेम्पोला वेळोवेळी थांबण्याचा आवाहन करून सुद्धा सदरच्या टेम्पो थांबत नसल्याने अहमदपूर पोलिसांच्या मदतीला जिल्ह्यातील आणखीन फोर्स रवाना करण्यात आला
पोलीस आपला पाठलाग सोडत नाहीत. हे लक्षात आल्याने टेम्पो मधील संशयित चोरट्यांनी टेम्पो रस्त्यावरच सोडून खंडाळी शिवारातील उसाच्या फडात पळून गेले.पाठलाग करणाऱ्या व नंतर आलेल्या पोलिसांनी, तेथील स्थानिक नागरिकांनी नमूद चोरट्यांचा उसाच्या फडात शोध घेतला असता ते उसाच्या फडातून पडीक माळरानावर पळून जात असल्याचे दिसले. तेव्हा पोलीस व खंडाळी गावातील स्थानिक नागरिकांनी त्यांचा पाठलाग करून तीन चोरट्यांना पकडले. बाकीचे चोरटे त्यांच्या इतर साथीदाराने आणलेल्या मोटार सायकलवरून पळून गेले. तेव्हा पोलिसांनी मोटारसायकल वरून पळून जाणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करून खंडाळी शिवारातच आणखीन पाच चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले.
अशा एकूण आठ चोरट्यांना त्यांनी चोरलेल्या मुद्देमाल व वाहनासह पोलीस स्टेशन अहमदपूर येथे आणून त्यांच्याकडे सविस्तर विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे
888
1) फक्रुद्दीन अब्दुल रहीम,वय 32 वर्ष, राहणार उठावल, तालुका हातील जिल्हा पलवण राज्य हरियाणा.
2) ताहीर रोशन, वय 32 वर्ष, राहणार अडवर, मेवाड राज्य हरियाणा.
3) मोहम्मद रफी शमशुद्दीन, वय 32 वर्ष, राहणार बाधोली तालुका पुन्हाना, जिल्हा मेवाड, राज्य हरियाणा.
4) मुफिद आसू, वय 21 वर्ष, राहणार उठावल तालुका हातिल जिल्हा पलवण राज्य हरियाणा.
5) आरिफखान फारुख, वय 33 वर्ष, राहणार घाटमिका तालुका पहाडी, जिल्हा भरतपुर राज्य राजस्थान.
6) शेख रफिक शेख हबीब, वय 26 वर्ष, राहणार साकार प्लॉट, लोहगाव, जिल्हा परभणी.
7) शेख साबिर शेख पाशा, वय 32 वर्ष, राहणार तुरीत पीर दर्गा परभणी.
8) शेख जाकीर शेख पाशा, वय 32 वर्ष, राहणार दर्गा रोड परभणी.
असे असल्याचे सांगून त्यांनी जिल्ह्यात व राज्यात विविध ठिकाणाहून जनावरे चोरी केल्याचे सांगितले.
त्यावरून पोलीस ठाणे अहमदपूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 414/2022 कलम 307, 353, 332, 336, 337, 379, 279, 440, 120 (ब) भादवी सह कलम 3 सार्वजनिक संपत्तीला हनी पोहोचवणे प्रतिबंध अधिनियम, कलम 7 क्रिमिनल अमेजमेंट अॅक्ट, कलम 5(अ)(1),9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976, कलम 11 (1),(घ) प्राण्यांना क्रुरतेने वागवने अधिनियम 1960, कलम 182, 177 मोटार वाहन कायदा कलम सारख्या गंभीर कलमान्वये नमूद आरोपीचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून नमूद गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरलेली जनावरे व वापरलेले मोटार सायकली, टेम्पो असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदर घटनेचा थरार रात्री 2 वाजल्यापासून ते सकाळी 11 वाजेपर्यंत सुरूच होता. जवळपास 9 तास, 350 किलोमीटर इतका पाठलाग करून नमूद आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून अहमदपूर पोलिसांनी किनगाव, गंगाखेड ,परळी शहर व परळी ग्रामीण, पिंपळदरा, राणी सावरगाव पोलीस स्टेशनचे रात्र गस्तीवरील पोलिसांची मदत घेऊन अतिशय उत्कृष्टरित्या जिल्ह्यातील व जिल्ह्याच्या बाहेरील गस्तीवरील पोलिसांशी संपर्क करून ताळमेळ व कम्युनिकेशन साधून जनावरे चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीतील कुख्यात,सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर/चाकूर चे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे अहमदपूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र केदार,विठ्ठल दुरपडे,पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर अंदोरीकर तसेच पोलीस अंमलदार सुशीलकुमार माने, सुहास बेंबडे, तानाजी आरादवाड, किशोर सोनवणे, सुदर्शन घुगे, विशाल मुंडे, बाळू मगर, नामदेव राठोड, चामे, शिंदे, पांचाळ,शेख, आलापुरे, साळवे यांनी केली आहे.
तसेच सदर पथकाला किनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड, पिंपळदरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विक्रम हराळे,पोलीस ठाणे गंगाखेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माने,परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मुंडे व त्यांच्या टीमने मोलाची मदत केली आहे
पोलीस अधीक्षकांनी कारवाईत भाग घेतलेल्या सर्व पोलीस अधिकारी/ अंमलदार यांचे अभिनंदन केले आहेत