अपात्रतेच्या याचीकेवर सोमवारी सुनावणी
शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर सध्या कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. अपात्रतेच्या याचिकांवर पुढील सुनावणी येत्या सोमवारी होणार आहे.
सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी दिलेल्या निर्देशानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे वकील ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी सुधारित निवेदन सादर केले. साळवे यांनी आजही शिंदे गटाच्या सदस्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही, या युक्तिवादाचा पुनरुच्चार केला. पक्षांतर बंदी कायदा हा असहमतीविरोधी कायदा होऊ शकत नाही.
ज्येष्ठ विधिज्ञ नानी पालखीवाला यांनी पक्षांतर बंदी कायदा हा असहमतीविरोधी कायदा असल्याचे वर्णन केले होते. एखाद्या आमदाराने पक्षप्रमुखाच्या आदेशाचे पालन केले नाही, याचा अर्थ पक्षांतर केले, असा होत नाही. पक्षादेशाच्या विरोधात मतदान केले किंवा पक्षाचा त्याग केला तर पक्षांतर बंदीचा कायदा लागू होतो, असा दावाही साळवे यांनी केला. साळवे यांच्या या युक्तिवादावर सरन्यायाधीशांनी गुरुवारी साळवे यांना अनेक उपप्रश्न विचारले. अखेर सुनावणी सोमवारी पुन्हा घेण्याचा निर्णय सरन्यायाधीशांनी घेतला.