लातूरच्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या शितल गोसावी यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार
लातूरच्या प्रादेशिक परिवहन विभागात मोटर वाहन निरीक्षक या पदावर कार्यरत कर्तव्यदक्ष महिला अधिकारी तथा माझं लातूर परिवाराच्या क्रियाशील सदस्या शीतल गोसावी यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
गोसावी समाज युवा प्रतिष्ठान लातूरच्या वतीने दयानंद महाविद्यालय सभागृहात संपन्न झालेल्या त्रिसूत्री महाअधिवेशनात श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते शीतल गोसावी यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजातील मान्यवर विभूतींचा मा. खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते प्रतिष्ठानच्या वतीने समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते योगेश बन, सुप्रसिद्ध व्याख्याते, कवी अविनाश भारती यांच्यासह गोसावी समाजातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर, प्रतिष्ठानचे पदाधिकारी तथा नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
त्रिसूत्री महाअधिवेशनात समाजभूषण पुरस्कार, गोसावी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन यशस्वीरीत्या करण्यात आले.
प्रादेशिक परिवहन विभागातील मोटर वाहन निरीक्षक शीतल गोसावी यांना मानाचा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समाजाच्या वतीने हा पुरस्कार मिळाल्याबद्दल शीतल गोसावी यांनी आभार मानले असून यापुढील काळातही आपली सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारी पार पाडण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.