साहेब...यांना गोळया घाला
तिन जनांनी केला सामूहिक बलात्कार
प्रकरण : एसआयटीकडे वर्ग
दोघा नराधमांना पोलिस कोठडी तर एक जन फरार
| भंडारा : दिल्लीतील निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती भंडारा जिल्ह्यात असुन भंडाऱ्यातील कन्हाळमोह गावाजवळ उघडकीस आलेल्या या घटनेमुळे राज्यच नव्हे तर संपुर्ण देश हादरुन गेला आहे.साहेब...यांना गोळया घाला अशी ओरड आता सर्व स्तरातून होवू लागली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील महिला घरगुती वादानंतर माहेरी निघाली असताना तीन जणांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. पीडितेवर सध्या
नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.तिची प्रकृती गंभीर असून रक्तस्राव थांबवण्यासाठी आणखी शस्त्रक्रिया कराव्या लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणाची 'एसआयटी'कडून चौकशी करण्याचे निर्देश शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पीडितेला सर्वतोपरी उपचार मिळावेत, असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
गोंदियाजिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील एका गावात राहणारी ३५ वर्षांची महिला ३० जुलैला कौटुंबिक कलहातून घरातून बाहेर पडली. भंडारा जिल्ह्यातील माहेरी ती पायीच निघाली होती. वाटेत तिला श्रीराम उरकुडे याने थांबवले. 'गाडीने घरी सोडतो' असे सांगून तिला गाडीत बसवले. घरी नेण्याऐवजी त्याने गोंदिया जिल्ह्यातल्या मुंडीपार गावाजवळ तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला पळसगाव मार्गावर नेले. आडजागी तिच्यावर अत्याचार केल्यावर तिला सोडून उरकुडे पसार झाला. रात्रीच्या सुमारास * एकट्याने जंगल तुडवणारी ही महिला कन्हाळमोह येथे पोहोचली. तिथे पुन्हा एका व्यक्तीने तिला घरी सोडण्याचे आश्वासन दिले. तिचा त्याच्यावर विश्वास बसला नाही. त्याचवेळी जवळच्याच ढाब्याजवळील टायर दुरुस्ती करणाऱ्याने त्या व्यक्तीसोबत जाण्यास धोका नसल्याचे सांगितले. घरी सोडण्याचे आश्वासन देणाऱ्याने तिला दुचाकीने जवळच्या शेतात नेले. तिथे टायर दुरुस्ती करणाराही आला. दोघांनी तिच्यावरं सामूहिक अत्याचार केला. सतत तीन दिवस या महिलेवर अत्याचार सुरू होते. दोघे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी अत्याचारानंतर पीडितेला कन्हाळमोह गावाजवळच्या रस्त्याच्यआकडेला फेकून पळ काढला. कारधा पोलीस ठाण्यांतर्गत मोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडलेली महिला ग्रामस्थांना दिसली. ग्रामस्थांनी याबाबत कारधा पोलिसांना कळवले. पोलिसांनी महिलेला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीदरम्यान तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला नागपूर येथे हलवण्यात आले. दरम्यान, या प्रकरणातील तीनपैकी दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली असून तिसऱ्याचा शोध सुरू आहे. अमित सार्वे आणि मोहम्मद अन्सारी या संशयितांना ८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या दोघांना पोलिसांनी घटनास्थळी नेले होते. गोंदियातील गोरेगावपासून भंडाऱ्यातील लाखनीपर्यंत सर्व सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या गुन्ह्याची सुरुवात गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव येथे झाल्याने भंडारा पोलिसांनी गोरेगाव पोलिसांकडे गुन्ह्याचा तपास वर्ग केला आहे. दोन्ही संशयित आरोपींना गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले असून फरारी संशयिताचा शोध गोंदिया पोलीस घेत आहेत. दरम्यान, नागपूर परिमंडळ क्रमांक १ येथील पोलीस आयुक्त लोहित मतानी हे भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नुकतेच रुजू झाले आहेत. त्यांच्यासमोर या प्रकरणाने आव्हान निर्माण केले आहे.
Tags:
Crime News