लातूर शहरातील ८० हजार घरांवर तिरंगा फडकविण्याचे मनपाचे उद्दिष्ट
मनपामध्ये तिरंगा विक्री स्टॉलचे आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन
लातूर/प्रतिनिधी:'हर घर तिरंगा' उपक्रमा अंतर्गत मनपाकडून शहर हद्दीतील ८० हजार घरांवर तिरंगा फडकवण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.शहरातील नागरिकांना तिरंगा झेंडा उपलब्ध व्हावा यासाठी मनपा मुख्यालयात तिरंगा विक्री स्टॉलचे उद्घाटन पालिका आयुक्त अमन मित्तल यांच्या हस्ते करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 'हर घर तिरंगा' हे अभियान राबविण्यात येत आहे.केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लातूर शहर महानगरपालिका हद्दीतही हा उपक्रम राबविला जाणार आहे.लातूर शहर हद्दीतील ८० हजार घरांवर तिरंगा फडकवण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे.यानुसार लागणारे झेंडे खरेदी करून शहरात ५ केंद्रांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.मनपाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने लोक वर्गणीतून दीड हजार झेंड्यांचे वाटप केले जाणार आहे. मनपाच्या मालकीच्या इमारतींवर खादीचे झेंडे फडकवले जाणार आहेत.
शहरातील विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.लोकसहभागातून प्रत्येक घरोघरी झेंडे लावण्याकरिता जनजागृती केली जात आहे. घंटागाडीच्या माध्यमातून जनजागृतीपर गीते वाजवली जात असून शहरात ठिकाणी फलकही लावण्यात आले आहेत.
नागरिकांना तिरंगा झेंडा उपलब्ध व्हावा,खरेदी करता यावा यासाठी मनपाच्या मुख्यालयात तिरंगा विक्री स्टॉल सुरू करण्यात आला आहे.पालिका आयुक्त अमन मित्तल यांच्या हस्ते बुधवारी( दि.३ ऑगस्ट) या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त शिवाजी गवळी, उपायुक्त श्रीमती मयुरा शिंदेकर,श्रीमती वीणा पवारए सहाय्यक आयुक्त श्रीमती मंजुषा गुरमे,सुहास विसपुते आदींसह अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. शहरातील नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहनही आयुक्त अमन मित्तल यांनी याप्रसंगी बोलताना केले.
--