गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
बनावट सातबारा तयार करून वापरल्याप्रकरणी लातूरमध्ये
दोन वकिलांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
एड. महेश मदने
लातूर : बनावट सातबारा तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी लातुरात दोन वकिलांसह सहा जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती एड. महेश मदने, एड. प्रकाश काळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
यावेळी अधिक माहिती देताना एड. महेश मदने म्हणाले की , न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मंडळींनी २०११ मध्ये बनावट तयार केलेल्या सातबाराचा वापर वर्ष २०१९ मध्ये चुकीच्या पद्धतीने करून आपल्या अशिलाची व शासनाची फसवणूक करण्यात आली. न्यायालयाच्या निर्णयानंतर लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात श्रीराम अर्जुन मदने यांच्या तक्रारीवरून लातूर येथील वकील श्रीकांत एकनाथ मदने, लखण एकनाथ मदने, आकाश एकनाथ मदने, मंगल एकनाथ मदने, सुशीला एकनाथ मदने आणि संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात वकीली व्यवसाय करणार्या सविता एकनाथ मदने यांच्याविरुद्ध भादवि कलम ४६५, ४६६, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बसवंतपूर शिवारातील गट नं. ३९ मधील शंकरराव मदने यांच्याकडून जमिन ३६ . ४२ आर खरेदी करण्यात आलेली होती. फिर्यादीच्या नावची १० आर जमीन सातबारामध्ये कमी दाखवण्यात आली. सन २०११ मध्ये हा सातबारा तयार करण्यात आला आणि त्याचा वापर करून २०१९ मध्ये उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात दावा दाखल करण्यात आलेला होता. त्यासाठी वापरण्यात आलेला सातबाराच खोटा आणि बनावट होता. त्यामुळे फिर्यादीची तर दिशाभूल आणि फसवणूक करण्यात आलीच परंतु न्यायालयाचीही फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी लेखी फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्यानंतरही त्यांनी दखल घेतली नव्हती. त्यामुळे न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाच्या निर्देशानुसार आता एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात वरिष्ठ विधिज्ञ सुनील सोनवणे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे महेश मदने यांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी व अशा प्रकारच्या अन्य गुन्ह्यांचीही माहिती मिळवून दोषींवर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली