'आष्टामोड' येथे अवैध गुटखा आणि दारूचा व्यापार !
आष्टामोड परिसरात आणि नांदगाव पाटी येथील एका हॉटेलमधून अवैध दारु आणि गुटख्याचा व्यापार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आष्टामोड परिसरातील मध्यवर्ती स्थान असल्याने आजूबाजूच्या गावातील लोक येथुनच दारुचे बॉक्स घेऊन जातात. येथे मोठी गर्दी असल्याने काहींना हॉटेलच्या थोड्या अंतरावर 7 तर कांहीना त्यांच्या गावात दारुचे बॉक्स पुरवले जातात. यामुळे परिसरातील कांही लोक अवैध धंद्याकडे वळले आहेत. कायदा व सुव्यवस्था वेशीला टांगून गावात अवैध दारू,गुटखा मोठ्या प्रमाणात विकली जाते आहे. या परिसरातील गावात अवैध देशी दारु मिळत असल्याने तळीराम गावात गोंधळ घालत आहेत. एवढेच नव्हे तर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रेत्यांवर अनेक वेळा कार्यवाही करुन सुद्धा हे व्यापारी पोलीसांच्या समोरून कारमध्ये दारुचे बॉक्स घेऊन जातात. त्यामुळे चक्क पाटीवर हॉटेलच्या नावाखाली अवैध दारुचा व्यापार होत असल्याची जोरदार चर्चा चालू आहे. पोलीसांनाही हे अवैध धंद्यावाले घाबरत नसल्याने नागरीकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. चाकूर पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून कार्यवाही करण्यात यावी अशी सर्वसामान्यांकडून मागणी होत आहे.