Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

कोरोना नंतर श्री गणेशाला सातव्या दिवशी जल्लोषात निरोप

कोरोना नंतर श्री गणेशाला सातव्या दिवशी जल्लोषात निरोप
गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या..!


उदगीर (संगम पटवारी) : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात तसेच ढोल ताशाच्या गजरात, गुलाल, फुलांची उधळण करीत फटाक्यांच्या आतषबाजीने उदगीर शहरातील गणरायाला मंगळवारी निरोप देण्यात आला. शहरात गणेश मंडळाच्यावतीने भव्य मिरवणुका काढण्यात आल्या होत्या.
उदगीर येथील  गणेश विसर्जन वेळी चोख बंदोबस्त....







मागील दोन वर्षे कोरोनामुळे गणेशोत्सवावर निर्बंध होते. मात्र, यंदा निर्बंधमुक्त उत्सव असल्याने गणेश मंडळाच्यावतीने विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. उदगीरच्या परंपरेनुसार सातव्या दिवशी गणरायाला निरोप देण्यात येतो. मंगळवारी सकाळपासूनच श्रीगणरायाला निरोप देण्यासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. सकाळी ११.३० वाजता मानाच्या पारकट्टी गल्लीतील आजोबा गणपतीच्या मूर्ती पूजन करून आरती करण्यात आले. याप्रसंगी माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुराग जैन, सहायक पोलीस अधीक्षक निकेतन कदम,पोनि गजानन भातलवंडे( स्थानिक गुन्हे शाखा) उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन, पोलीस निरीक्षक गोरख दिवे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, प्रा. मल्लेश झंगा स्वामी, राजकुमार हुडगे,पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक भिमराव गायकवाड  आदींसह भाविकांची उपस्थिती होती.
आजोबा गणपतीची पूजा झाल्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला. ढोलताशांचा गजर करीत पारंपरिक हलगीचा ठेका, संबळ वाद्याच्या आवाजावर गुलालाची उधळण बाप्पांच्या जयघोषाने अवघे उदगीर शहर दुमदुमून गेले होते. मिरवणुकीत हातात भगवे ध्वज घेऊन गणेश मंडळाचे भक्त मंडळापुढे लयबद्ध पद्धतीने नृत्य करताना दिसत होते.
Previous Post Next Post