मानवता तीर्थ म्हणून जगात रामेश्वर गाव उदयास यावे
-ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे प्रतिपादन
लातूर दि.०५ :- महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील आदर्श गाव लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर ( रुई ) हे गाव डॉ. विश्वनाथजी कराड सरांनी अत्यंत सुंदर आणि कल्पक राष्ट्रीय एकात्मतेचे आणि विश्वशांतीचे मॉडेल, पथदर्शी निर्माण केले आहे. येत्या काळात हेच रामेश्वर जगात मानवतातीर्थ म्हणून उदयास येईल असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत तथा संशोधक श्री. हरी नरके यांनी केले.
लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर ( रुई ) येथे ज्येष्ठ विचारवंत श्री. हरी नरके यांनी सोमवारी भेट देऊन संपूर्ण गावची पाहणी केली त्यानंतर आयोजित पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी माईर्स एमआयटी पुणे व विश्वशांती केंद्र आळंदी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथजी कराड, साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत श्री. रतनलालजी सोनग्रा, रामेश्वर येथील माजी सरपंच श्री. तुळशीराम अण्णा कराड, श्री. काशीराम नाना कराड यांची प्रमुख उपस्थिती होती.
देशभरातील जवळपास पन्नास ते साठ हजार गावे पाहिली मात्र शाळा, दवाखाना, तालीम, वाचनालय,
रामेश्वर गावच्या माध्यमातून डॉ. विश्वनाथजी कराड यांनी विकसित गावाचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा पथदर्शी प्रकल्प निर्माण केला असल्याचे सांगून हरी नरके म्हणाले की, अतिशय सुंदर निर्माण केलेल्या या गावचे अनुकरण देशभरातील गावोगावी झाले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
उच्च शिक्षित आणि जागतिक कीर्तीचे असूनही विश्वनाथजी कराड हे सामान्यांना सोबत घेऊन काम करतात त्यांच्यात खूप मोठी एनर्जी आहे. त्यांचे वय ८०-८२ असले तरी त्यांच्या कामाच्या रूपातून दीडशे असेल असेच वाटते असे सांगून हरी नरके म्हणाले की, सरांनी सुसंस्कृत आणि शिक्षणप्रेमी पुढची पिढी तयार केली. कराड सर म्हणजे झपाटलेलं झाड आहे. काम करणाऱ्याच्या पाठीशी सतत उभे असतात. देवघराप्रमाणे प्रत्येकाच्या घरात पुस्तकाचे घर असावं, प्रत्येकाला वाचण्याची आवड निर्माण व्हावी, गावोगावी ग्रंथालय असली पाहिजेत असेही शेवटी त्यांनी बोलून दाखविले.
एकाच गावात सर्व गोष्टी असणं हे फार दुर्मिळ असतं मात्र रामेश्वर हे गाव भारतीय एकात्मतेचे गाव आहे असे सांगून यावेळी बोलताना ज्येष्ठ विचारवंत रतनलालजी सोनग्रा म्हणाले की, मनात निर्माण झालेली इच्छा ती प्रत्यक्षात पूर्ण व्हावी असेच विश्वनाथजी कराड सर आहेत. धनशक्ती अनेकाकडे असते मात्र तिचा वापर सत्कार्यासाठी किती होतो हे महत्त्वाचे असून त्यासाठी कराड सरांसारखी इच्छाशक्ती असावी लागते असे बोलून दाखविले.
भारत देश उद्या विश्वगुरू होईल खऱ्या अर्थाने ज्ञानाचे दालन असेल. लहानपणी स्वामी विवेकानंद यांचे २५ पैशाच्या घेतलेल्या पुस्तकातून माझ्या कार्याचा उगम झाला आहे. आजपर्यंत जे काही केले त्यात मी नाममात्र आहे. कदाचित ती परमेश्वराचीच इच्छा असेल असे उद्गार पुणे येथील माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष व आळंदी येथील विश्वशांती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथजी कराड यांनी काढले.