दिवंगत पत्रकार चंद्रकांतअप्पा मिटकरी यांच्या दातृत्वाचा समाजापुढे आदर्श
- पद्मभूषण डॉ.अशोकराव कुकडे
लातूर/प्रतिनिधी:दिवंगत पत्रकार चंद्रकांतअप्पा मिटकरी यांनी स्वतःच्या दातृत्वातून समाजापुढे आदर्श निर्माण केला. स्व.मिटकरी यांचे हे कार्य आगामी अनेक पिढ्यांना स्मरणात राहील, असे मत पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे काका यांनी व्यक्त केले.
स्व.चंद्रकांतअप्पा मिटकरी यांनी विवेकानंद रुग्णसेवा सदनच्या उभारणीसाठी मोठे आर्थिक योगदान दिले.त्या योगदानातूनच रुग्णसेवा सदनसाठी भूखंड घेण्यात आला. त्या जागेवर सर्वांच्या सहकार्यातून रुग्णसेवा सदनची वास्तू उभी राहिली आहे.स्व.मिटकरी यांच्या कार्याचे स्मरण आणि प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम शनिवारी ( दि.१५ ऑक्टोबर )रुग्ण सेवा सदन येथे घेण्यात आला. त्याप्रसंगी डॉ.कुकडे काका बोलत होते.विवेकानंद मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष अनिल अंधोरीकर,
डॉ.गौरी कुलकर्णी,जेष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे,अरुण समुद्रे,विजयकुमार स्वामी,विष्णू आष्टीकर, संदीप भोसले,छायाचित्रकार नारायण पावले आदींसह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
कुकडे काकांनी स्व.मिटकरी यांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला.रुग्णसेवा सदन उभारण्याची कल्पना पुढे आल्यानंतर त्यांनी उदारपणे आर्थिक मदत केली.स्वतः पुढाकार घेत इतरांनाही मिटकरी यांनी प्रेरणा दिल्याचे डॉ.कुकडे यावेळी म्हणाले.
संस्थाध्यक्ष अनिल अंधोरीकर यांनी स्व.चंद्रकांत मिटकरी यांचा विवेकानंद रुग्णालयाशी कसा संपर्क आला याची माहिती दिली. संपर्कातून मिटकरी यांना रुग्णालयाच्या सामाजिक कार्याची माहिती झाली.या कार्यात आपणही योगदान द्यावे,अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली आणि ती त्यांनी पूर्णही केली. त्यांचे दातृत्व अतुलनीय असल्याचे अंधोरीकर म्हणाले.
यावेळी बोलताना जयप्रकाश दगडे यांनी दातृत्व काय असते ते मिटकरीअप्पांनी दाखवून दिल्याचे सांगितले.मिटकरी यांनी दिलेल्या देणगीतून विवेकानंद मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरने चिरंतन स्मारक उभे केले. मिटकरी यांनी दिलेल्या निधीतून घेतलेल्या भूखंडावर रुग्णसेवा सदनाची उभारणी केली.हे स्मारक मिटकरी यांच्या दातृत्वाचा पुढील कित्येक पिढ्यांना विसर पडू देणार नाही,असेही ते म्हणाले.
प्रारंभी डॉ.अशोकराव कुकडे काका यांच्या हस्ते स्व.मिटकरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी मिटकरी यांना अभिवादन केले.यावेळी रुग्णालयातील डॉक्टर्स,अधिकारी,कर्मचारी, पत्रकार आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.