लातूरमध्ये आनंदाचा शिधा वाटपास सुरुवात...
रेशन दुकानात 'माझं लातूर' परिवाराच्या सदस्यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वितरण
लातूर: सर्वसामान्य लोकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्य सरकारने आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले होते. हा आनंदाचा शिधा लातूर शहरात रेशन दुकानांच्या माध्यमातून पात्र शिधाधारकांना वाटप करण्यात येत आहे. यात रवा, चणा डाळ, साखर प्रत्येकी १ किलो आणि पामतेल याचा समावेश असून हे किट फक्त शंभर रुपये या नाममात्र दरात लाभार्थ्यांना दिले जात आहे.
शहरातील लेबर कॉलनी भागात असलेल्या १८ नंबर रेशन दुकानात आज या उपक्रमास प्रारंभ झाला. माझं लातूर परिवाराचे सतीश तांदळे, शशिकांत पाटील आणि डॉ सितम सोनवणे यांच्या हस्ते पात्र शिधाधारकांना आनंदाचा शिधा वितरीत करण्यात आला. या रेशन दुकानाच्या अंतर्गत एकूण ४६० शिधाधारकांना याचा लाभ होणार असल्याची माहिती सचिन नरहरे यांनी दिली. याप्रसंगी मा. नगरसेविका कमलबाई मिटकरी, प्रमोद गुडे, दत्तात्रय क्षीरसागर यांच्यासह पात्र लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.